सिडकोत समाजकंटकांकडून चारचाकी गाड्यांची तोडफोड,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:47+5:302021-05-17T04:13:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिडको : दोन दिवसांपूर्वी सिडकोत टिपर गँगने धुमाकूळ घातल्याचा प्रकार ताजा असतानाच रविवारी (दि. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : दोन दिवसांपूर्वी सिडकोत टिपर गँगने धुमाकूळ घातल्याचा प्रकार ताजा असतानाच रविवारी (दि. १६) लेखानगर येथील सुंदरबन कॉलनीत रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी जवळपास सहा ते सात चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, गणेश शिंदे, कोल्हे आदींसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तोडफोड करणाऱ्या टोळक्याचा शोध सुरू केला असून एका संशयितास ताब्यात घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेखानगर भागातील सुंदरबन कॉलनी येथे रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोन ते तीन दुचाकीवरून आलेल्या ४ ते ५ जणांच्या टोळक्याने काठ्या व दगडाने नागरिकांनी घरासमोर पार्किंग केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून नुकसान केले. समाजकंटकांनी धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. याआधीही या ठिकाणी असाच प्रकार समाजकंटकांनी केला आहे. टोळक्याने अशाप्रकारे तोडफोड का केली याच्या तपासाला पोलिसांनी सुरुवात केली आहे. दरम्यान, वाहनाच्या तोडफोड प्रकरणात रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
चौकट
पोलिसांचा नागरिकांवरच रोष
सिडकोत अज्ञात समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले खरे, परंतु पोलिसांनी समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी नागरिकांनाच खडेबोल सुनावल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.