आडगावला चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:13 AM2021-03-22T04:13:27+5:302021-03-22T04:13:27+5:30
पीडीत चिमुकलीच्या घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत संशयित लोदवाल याने मागील आठवड्यात फिर्यादीचे घर गाठले. त्याने चिमुकलीला खाऊ देण्याच्या ...
पीडीत चिमुकलीच्या घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत संशयित लोदवाल याने मागील आठवड्यात फिर्यादीचे घर गाठले. त्याने चिमुकलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार करून नखांनी दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिमुकलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगितल्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत लोदवालविरुध्द फिर्याद दिली. फिर्यादीनुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून फरार संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास महिला उपनिरीक्षक चांदणी पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
----
मखमलाबादला ४६ हजारांची घरफोडी
पंचवटी : मखमलाबाद परिसरातील स्वामी विवेकानंदनगर येथे बंद रो-हाऊसचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातून ४६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी करत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नंदा विनय भोये यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडी झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
स्वामी विवेकानंद नगर येथील वैभव लक्ष्मी रो हाऊस क्रमांक १ येथे राहणारे भोये गेल्या मंगळवारी कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. भोये घरी आल्यानंतर घराचा दरवाजा व कुलूप तोडलेले त्यांना दिसले. त्यांनी तत्काळ घरात प्रवेश केला असता घरातील साहित्य जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. यावरून घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी म्हसरुळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.
----
गणेशवाडीत रिक्षा पेटविण्याचा प्रयत्न
पंचवटी : गणेशवाडी सहजीवन नगर परिसरात रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी घरासमोर उभी असलेली रिक्षा जमिनीवर पाडून काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत अज्ञात संशयितांविरुध्द पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सहजीवननगरला राहणाऱ्या लक्ष्मण विजय कोठेकर याने तक्रार दाखल केली आहे. कोठेकर याने नेहमीप्रमाणे रात्री घरासमोर मोकळ्या जागेत उभ्या केलेली रिक्षा (एमएच१५ ए के ५६३५) अज्ञात दोघा संशयितांनी खाली पाडून काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून हूड जाळून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लक्ष्मण कोठेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---