चार वर्षांपासून वडाळागाव ‘जॉगिंग ट्रॅक’चा विकास रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:38 AM2018-10-31T00:38:24+5:302018-10-31T00:39:01+5:30
मागील चार वर्षांपासून वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर हा साधारण दीड किलोमीटरच्या जॉगिंग ट्रॅकचा विकास रखडला आहे. त्यामुळे हा ट्रॅक जणू समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
नाशिक : मागील चार वर्षांपासून वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर हा साधारण दीड किलोमीटरच्या जॉगिंग ट्रॅकचा विकास रखडला आहे. त्यामुळे हा ट्रॅक जणू समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. ट्रॅकमध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्याने त्याचा त्रास सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. वडाळागाव महापालिकेच्या हद्दीमधील पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे. या भागाला नेहमीच मूलभूत सोयी-सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आला आहे. पिण्याच्या पाण्यापासून रस्त्यांपर्यंत अन् पथदीपांपासून स्वच्छतेपर्यंत अशा सुविधांची वानवा येथे प्रकर्षाने जाणवते. आठ ते दहा वर्षांपूर्वी वडाळा चौफुलीवरील महारुद्र हनुमान मंदिर ते साईनाथनगर सिग्नलपर्यंत कालव्याच्या जागेत ट्रॅक तयार के ला गेला. हा ट्रॅक तयार क रण्यापूर्वी येथे विविध प्रजातीची झाडे लावण्यात आली. त्यामुळे संपूर्ण ट्रॅकची जागा वृक्षाच्छादित झाली. मात्र यानंतर ट्रॅक तयार करताना अत्यंत थातूरमातूर पद्धतीचा अवलंब केला गेला. केवळ झाडांच्या मध्यभागी सोडण्यात आलेल्या पायवाटेवर मुरूम टाकून ‘ट्रॅक’ आखला गेला; मात्र या ट्रॅकचा विकास साधण्यासाठी यानंतर कधीही कोणतेही प्रयत्न महापालिकेकडून केले गेले नाही.
पथदीपांसह बाकांचा अभाव
परिणामी ट्रॅकची वाट बिकट झाली असून, संध्याकाळच्या फेरफटक्याला नागरिकांना मुकावे लागते. कारण ट्रॅकवर एकाही पथदीपाची व्यवस्था नसल्याने व झाडे उंच वाढल्याने संपूर्णत: अंधार पसरलेला असतो. दोन्ही बाजूंना संरक्षण कुंपण नसल्यामुळे मोकाट कुत्रे, जनावरे तसेच टवाळखोरांचा येथे राबता असतो. ट्रॅकमध्ये एकाही ठिकाणी बसण्यासाठी बाक लावण्यात आलेले नाही किंवा ग्रीन जीमचे साहित्यही बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे हा ट्रॅक असून, नसल्यासारखा आहे. ट्रॅकच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनीदेखील कधी प्रयत्न केले नाही. आरोग्याबाबत सजग असलेल्या वडाळावासीयांना सध्या ‘समस्यांच्या ट्रॅक’वरून चालावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नाल्याची दुर्गंधी अन् अतिक्रमण
या ट्रॅकवरून चालताना विविध समस्यांच्या गर्तेतून वाट काढावी लागते. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तीनही प्रहरी ट्रॅकच्या मध्यभागी दुचाकी, चारचाकी वाहनांची अनधिकृत पार्किंग असते. त्यामुळे हा ट्रॅक की वाहनतळ? असा प्रश्न उपस्थित होतो. ट्रॅकजवळून उघडा पावसाळी नैसर्गिक नाला वाहत असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरते. या नाल्यामध्ये कधीही स्वच्छता केली जात नाही किंवा कुठल्याहीप्रकारची औषध फवारणीही महापालिकेच्या संबंधित विभागाकडून होत नाही.