चार वर्षांतील सरकारच्या अनास्थेचा बळी : कोकाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:36 AM2018-05-26T00:36:17+5:302018-05-26T00:36:17+5:30
सिन्नरसारख्या दुष्काळी भागात एसईझेड होणे ही खूप मोठी घटना होती. सर्वपायाभूत सुविधा असलेल्या या तालुक्यातील दहा हजार लोकांना मिळेल अशा क्षमतेचा प्रकल्प होता. मात्र चार वर्षांत सरकार किंवा उद्योगमंत्र्यांनी त्याकडे लक्ष पुरवले नाही.
नाशिक : सिन्नरसारख्या दुष्काळी भागात एसईझेड होणे ही खूप मोठी घटना होती. सर्वपायाभूत सुविधा असलेल्या या तालुक्यातील दहा हजार लोकांना मिळेल अशा क्षमतेचा प्रकल्प होता. मात्र चार वर्षांत सरकार किंवा उद्योगमंत्र्यांनी त्याकडे लक्ष पुरवले नाही. त्यामुळे हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नाही, असे मत सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. गुळवंच आणि मुसळगाव येथील इंडीया बुल्स कंपनीचा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर या प्रकल्पाला मदत करण्यासाठी कोकाटे यांनी प्रयत्न केले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या सध्याच्या अवस्थेबाबत त्यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी हा निव्वळ सरकारी अनास्थेचा बळी असल्याची भावना व्यक्त केली. सिन्नर तालुक्यात पायाभूत सुविधा उत्तम असून, त्यामुळेच हा प्रकल्प येथे आला तर दहा हजार लोकांना रोजगार मिळेल म्हणून मी प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीत अॅक्रॉस द टेबल चर्चेत जमिनी देण्यात आल्या. प्रकल्पाच्या कामाला गती मिळावी यासाठी मी पाठपुरावा केला. कंपनीच्या अधिकाºयांना घेऊन जिल्हाधिकाºयांकडे बैठका घेतल्या तशा मंत्री आणि सचिवांकडे बैठका घेऊन हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यानंतर शासन आणि प्रशासन असे सर्वांनीच त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या चार वर्षांत मंत्री सचिव किंवा अगदी जिल्हाधिकाºयांकडे देखील बैठका झाल्या नाही असे सांगून ते म्हणाले की, या ठिकाणी काही प्रमाणात काम सुरू झाले तेव्हा युुनियनच्या नेत्यांनी देखील खूप त्रास दिला. मी माझ्यापरीने कंपन्यांना पाठबळ दिले. परंतु आता माजी आमदार म्हणून काय करणार? असा हतबल प्रतिप्रश्न त्यांनी केला. लोकांनी साथ दिली असती तरी मी काही तरी करू शकलो असतो, असेही ते म्हणाले.