ऊसतोडणी करतांना आढळले बिबट्याचे चार बछडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 03:23 PM2020-02-12T15:23:35+5:302020-02-12T15:24:18+5:30
सिन्नर: तालुक्यातील सोमठाणे येथे ऊसतोडणी करतांना बुधवारी सकाळी आठ वाजता चार नवजात बछडे आढळून आले आहेत.
सिन्नर: तालुक्यातील सोमठाणे येथे ऊसतोडणी करतांना बुधवारी सकाळी आठ वाजता चार नवजात बछडे आढळून आले आहेत. त्यातील एका बछड्याला मादी घेऊन गेली असून उर्वरित तीन बछड्यांची मादीला भेट घडवून आणण्यासाठी सिन्नर वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत. पूर्व भागातील सोमठाणे येथे उत्तम निवृत्ती पदाडे यांच्या दोन एक ऊसाची तोडणीचे दोन दिवसांपासून सुरु आहे. कोळपेवाडी साखर कारखान्यात ऊस तोडून नेण्यासाठी कामगार दोन दिवसांपासून ऊसतोड करीत असतांना बुधवारी सकाळी आठ वाजता ऊसाच्या शेतात चार बछडे आढळून आले. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी शेतातून काढता पाय घेतला. पदाडे यांनी याची माहिती ग्रामस्थ साईनाथ खांडेकर, मच्छिंद्र चव्हाणके, मधू ठोंबरे यांना दिल्यानंतर त्यांनी सिन्नरच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक शरद थोरात, वनसेवक एम. व्ही. शिंदे, एन. एन. वैद्य, बालम शेख यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिसर निर्मनुष्य केला. थोड्यावेळाने ऊसाच्या शेतात असलेल्या मादी एक बछडा घेऊन ऊसाच्या शेतात गेली. मात्र उर्वरित तीन बछडे घटनास्थळी होते. वनविभागाच्या कर्मचाºयांनी परिसर निर्मनुष्य केला. त्यानंतर या बछड्यांना मादीची भेट घडविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. दरम्यान, मादी व बछड्यांचा वावर असल्याने परिसरातील शेतकºयांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून घटनास्थळी पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे.
------------------------------
घटनास्थळी दोन टॅप कॅमेरे लावले वनविभागाने मादी व बछड्यांची भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. बछडे न भेटल्यास मादी आक्रमक होण्याची शक्यता असते. त्यामुळे मादी बछडे घेऊन गेली पाहिजे अशी धारणा असते. या मादी बछड्यांची भेट झाली की नाही हे पाहण्यासाठी घटनास्थळी वनविभागाने बछड्यांजवळ दोन टॅप कॅमेरे लावले आहेत.