मदरशाचे चौदा विद्यार्थी रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:49 AM2018-08-07T00:49:48+5:302018-08-07T00:50:18+5:30
परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश येत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गावातील दारुल उलूम गौसिया फैजाने मदार या मदरशामध्ये शिकत असलेले निवासी चौदा विद्यार्थी अचानक थंडी-तापाने फणफणले आहेत.
वडाळागाव : परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश येत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गावातील दारुल उलूम गौसिया फैजाने मदार या मदरशामध्ये शिकत असलेले निवासी चौदा विद्यार्थी अचानक थंडी-तापाने फणफणले आहेत. दोन दिवसांत चौदा विद्यार्थ्यांसह धर्मगुरूंना पालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वडाळागाव परिसरातील सादिकनगर, महेबूबनगरसह संपूर्ण वडाळागाव गावठाण परिसरात डासांच्या वाढत्या उच्छादाने नागरिक हैराण झाले आहेत. वडाळागावातील संसर्गजन्य सांधेदुखी, चिकुनगुण्या या आजाराने मागील महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात डोके वर काढले होते.
डासांच्या अळ्यांची उत्पत्ती
वडाळागाव परिसरात सर्वेक्षणादरम्यान घरगुती पाणीसाठ्यामध्ये डासांच्या अळ्यांची उत्पत्ती आढळून आली होती. हिवताप नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित घरांमधील वापराच्या पाणीसाठ्यात औषध फवारणी क रत पाणीसाठे रिकामे करण्याच्या सूचनादेखील जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केल्या होत्या; मात्र अद्याप नागरिकांच्या घरांमधील पाणीसाठ्यात होणारी अळ्यांची उत्पत्ती थांबत नसल्याचे निदर्शनास आले आहे. पुन्हा साथीच्या आजाराचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत मदरशाचे चौदा विद्यार्थी व धर्मगुरू मौलाना कारी जुनेद आलम हेदखील संसर्गजन्य थंडी-तापाच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. काही रुग्ण विषमज्वर आजाराचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. रक्तनमुने संकलन करण्यात आले असून, तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकाºयांनी दिली. पावसाच्या हजेरीनंतर जुलैअखेर वडाळागाव परिसरात पुन्हा डासांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक स्वच्छतेचाही प्रश्न गावात ‘जैसे थे’ आहे. गोपालवाडी, राजवाडा, जय मल्हार कॉलनी, सादिकनगर, महेबूबनगर या भागात गटारी तुंबल्या असून, सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. जय मल्हार कॉलनीजवळ कॅनॉल रस्त्याला लागून असलेली भूमिगत गटार महिनाभरापासून तुंबलेली असल्यामुळे पाटाच्या सखल भागात सांडपाण्याचे डबके साचले आहे. तसेच गोपालवाडी रस्त्यावरही गटारी वाहत असून, गटारींची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे. संजरी मार्ग, मुख्य वडाळा रस्त्यालगतच्या उघड्या गटारींचा गाळ उपसला गेला असला तरी उर्वरित परिसरातील गटारींची अवस्था बिकट आहे.