महिलेसह चौघांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Published: June 30, 2017 12:46 AM2017-06-30T00:46:01+5:302017-06-30T00:46:16+5:30
नाशिक :जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्यांपैकी एका महिलेसह चौघांनी दुपारच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्यांपैकी एका महिलेसह चौघांनी दुपारच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत महिलेला रोखल्याने पुढील अनर्थ टळला. सदर महिलेस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
महापालिका हद्दीतील गौतमनगर, साठेनगर, रमाबाई आंबेडकरनगर, शांतीनगर येथे राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना घरपट्टी लागू करावी, तसेच मूलभूत सुविधा पुरवाव्यात आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली या झोपडपट्ट्यांमधील रहिवासी गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
आंदोलनकर्त्यांच्या मागण्या लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली व त्यासंदर्भात दोन वेळा बैठकाही झाल्या. मात्र अजूनही याप्रकरणी सकारात्मक तोडगा निघाला नसल्याने उपोषणकर्ते अद्यापही बसून आहेत.