बोट क्लबच्या निविदांवर चौथ्यांदा फुली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:36 AM2018-11-01T01:36:05+5:302018-11-01T01:36:27+5:30
गंगापूर येथील बोट क्लब चालविण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या निविदा भरण्यासाठी मंगळवारी (दि. ३०) अंतिम मुदत असताना तत्पूर्वीच त्यावर प्रशासनाने फुली मारली आणि बोट क्लब तसेच येथील रिसोर्ट चालविण्याचे काम एकाच ठेकेदाराला देण्याच्या नावाखाली सोमवारी (दि. २९) सायंकाळी निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.
नाशिक : गंगापूर येथील बोट क्लब चालविण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या निविदा भरण्यासाठी मंगळवारी (दि. ३०) अंतिम मुदत असताना तत्पूर्वीच त्यावर प्रशासनाने फुली मारली आणि बोट क्लब तसेच येथील रिसोर्ट चालविण्याचे काम एकाच ठेकेदाराला देण्याच्या नावाखाली सोमवारी (दि. २९) सायंकाळी निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. २०१२ मध्ये बोट क्लब झाल्यानंतर आतापर्यंत चारवेळा अशाप्रकारच्या निविदा रद्द करण्यामागे केवळ एका विशिष्ट ठेकेदाराची प्रेरणा कारणीभूत असून, त्याला काम मिळत नसल्याने वेळोवेळी विविध कारणे दाखवून निविदा रद्द करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नाशिकमध्ये गंगापूर येथे नयनरम्य ठिकाणी पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी बोट क्लब साकारण्यात आले आहे; मात्र विशिष्ट संस्थेसाठी त्यावर निविदा नाकारून त्या रद्द करण्यात येतात. यंदाही २ आॅक्टोबर रोजी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याची मुदत मंगळवारी संपणार असताना महामंडळाने रिसोर्ट आणि बोट क्लब चालविण्याचे काम एकाच कंत्राटदाराला देण्याचा निर्णय झाल्याने ही निविदा रद्द करीत असल्याचे तोंडी सांगितले. वास्तविक, रिसोर्ट आणि बोट क्लब चालविणे या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. दोन्ही कामांची वैशिष्ट्ये वेगळी आहेत; मात्र असे असताना महामंडळ जाणीवपूर्वक घोळ घालत असल्याचा आरोप होत आहे. बोट क्लब चालविण्याचा ठेका निश्चित झाला असता तर नाशिककरांना ही दिवाळी भेट ठरू शकली असती; मात्र महामंडळाच्या घोळामुळे ते शक्य होणार नाही.
प्रकल्प वाया जाण्याची शक्यता
गंगापूर धरणावर सध्या ४८ बोटी असून, उर्वरित मोठ्या बोटी पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांच्या सूचनेनुसार येथून नेण्यात आल्या त्या परत आल्याच नाहीत. सध्याच्या ४८ बोटींचे आयुर्मान संपण्याच्या मार्गावर असून, त्यामुळे मोठा प्रकल्प वाया जाण्याची शक्यता आहे.
४बोट क्लब चालविण्याचा ठेका निश्चित झाला असता तर नाशिककरांना ही दिवाळी भेट ठरू शकली असती; मात्र महामंडळाच्या घोळामुळे ते शक्य होणार नाही.