चौघांचा परवाना निलंबित
By admin | Published: April 6, 2017 02:06 AM2017-04-06T02:06:28+5:302017-04-06T02:06:43+5:30
नाशिक : पोलीस आयुक्तालय व प्रादेशिक परिवहन विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे़
नाशिक : पोलीस आयुक्तालय व प्रादेशिक परिवहन विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास बुधवारपासून (दि़ ५) सुरुवात केली आहे़ शहरात बुधवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत चौघा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून तीन महिन्यांसाठी त्यांचा वाहन चालविण्याचा परवानाही निलंबित केला आहे़
सर्वोच्च न्यायालयाने वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण केले जात असल्यामुळे अपघात वाढत असल्याचा निष्कर्ष काढला होता़ त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी मोबाइलवर बोलताना आढळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईबरोबरच वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले होते़ न्यायालयाच्या या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभाग व शहर पोलीस यांनी बुधवारी संयुक्तरीत्या शहरात मोहीम राबविली़
गत वर्षभरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ८४८ बस व रिक्षांचालकांचे वाहन परवाने निलंबित केले़ तर ३५८ चालकांचे परमिट निलंबित करीत ४७१ वाहनांची नोंदणी रद्द केली़ वाहन क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या मालाची वाहतूक करणाऱ्या ९३ वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ५७ चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)