कोल्हा, उदमांजर, मुंगसाची शिकार भोवणार ! वन्यजीव कायद्यात सुधारणा; संरक्षण, संवर्धनाच्या दर्जाला बळकटी

By अझहर शेख | Published: February 8, 2023 01:46 PM2023-02-08T13:46:24+5:302023-02-08T13:47:27+5:30

वन्यजीव कायदा १९७२ मध्ये झालेल्या काही सुधारणांमुळे वन्यप्राण्यांच्या बेकायदा व्यापारावर अंकुश बसण्यास मदत होईल, असा आशावाद वन्यप्राणीप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे.

Fox, wildcat, mongoose Hunting will become expensive | कोल्हा, उदमांजर, मुंगसाची शिकार भोवणार ! वन्यजीव कायद्यात सुधारणा; संरक्षण, संवर्धनाच्या दर्जाला बळकटी

कोल्हा, उदमांजर, मुंगसाची शिकार भोवणार ! वन्यजीव कायद्यात सुधारणा; संरक्षण, संवर्धनाच्या दर्जाला बळकटी

Next

नाशिक : वन्यजीवांची शिकार, तस्करीवर अंकुश बसावा व नामशेष होऊ पाहणाऱ्या वन्यप्राणी, पक्षी, सर्प प्रजातींचे संरक्षण, संवर्धन व्हावे, या उद्देशाने केंद्र सरकारकडून भारतीय वन्यजीव कायद्यात दुरुस्ती करत काही सुधारणा करण्यात आल्या. यामुळे आता कोल्हा, उदमांजर, मुंगुस, तरस अन् साळींदरसारख्या वन्यप्राण्यांनाही वन्यजीव संरक्षण अनुसूची-१मध्ये स्थान देण्यात आले आहे. यामुळे या वन्यप्राण्यांची शिकार केल्यास संबंधितांना कठोर शिक्षा भोगावी लागू शकते.

वन्यजीव कायदा १९७२ मध्ये झालेल्या काही सुधारणांमुळे वन्यप्राण्यांच्या बेकायदा व्यापारावर अंकुश बसण्यास मदत होईल, असा आशावाद वन्यप्राणीप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. शिक्षेच्या तरतुदींमध्येही बदल करत शिक्षेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. दंडाच्या रकमेतही वाढ करून २५ हजारांच्या दंडाची शिक्षा आता थेट लाखावर जाऊन पोहोचली आहे.    

वन्यजीव कायद्यातील या सुधारणांमुळे यापूर्वी शेड्यूल-२ किंवा ४ मध्ये असलेल्या वन्यजीवांना थेट शेड्यूल-१मध्ये स्थान दिले गेले आहे. यामुळे या वन्यप्राण्यांच्या संवर्धनाची स्थिती भविष्यात अधिक उंचावण्यास मदत होणार आहे.

साळींदर थेट अव्वलस्थानी 
यापूर्वी साळींदर (सायाळ) हा वन्यप्राणी अनुसूची-४ मध्ये होता; मात्र आता त्याचा समावेश अनुसूची-१मध्ये करण्यात आला आहे. यासह रानपिंगळा घुबडानंतर श्रृंगी घुबडालाही अनुसूची-१मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मुंगसाच्या सर्व प्रजातींनाही अनुसूची-१मध्ये अव्वलस्थान देण्यात आले आहे. यामुळे मुंगसाची शिकार किंवा त्यास कैद केल्यास कारावासासह मोठा दंडदेखील भरावा लागू शकतो.

...आता हे पक्षी अनुसूची-१मध्ये 
श्रृंगी घुबड, बहिरी ससाणा (फाल्कन), शिक्रा, राखी धनेश, निळा माशीमार (ब्लू फ्लायकॅचर), काळ्या मानेचा करकोचा, कॉमन क्रेन, डोमिसेल क्रेन, सायबेरियन क्रेन, सारस क्रेन, कॉमन पोचार्ड (लहान लालसरी), दुर्मीळ युरेशियन स्पुनबिल (दर्वीमुख)


राज्यप्राणी शेकरुसुद्धा अनुसूची १मध्ये 
महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरु यापूर्वी अनुसूची-२मध्ये होता; मात्र, सुधारणेनंतर त्यास आता अनुसूची-१मध्ये स्थान देण्यात आले आहे. यामुळे शेकरुच्या संवर्धनासाठी मदत होणार आहे. नाशिकमध्ये शेकरुला चक्क एका पेट शॉपमध्ये विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार मागील वर्षी उघडकीस आला होता. या प्राण्याचा संरक्षण दर्जा आता वाढविल्यामुळे वाघ, बिबट्याप्रमाणे त्यालाही स्थान दिले गेले आहे.
 

Web Title: Fox, wildcat, mongoose Hunting will become expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.