शेतजमीन व्यवहारात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 01:09 AM2020-10-17T01:09:27+5:302020-10-17T01:09:47+5:30
एकाच शेतजमिनीचे अनेकांना साठेखत करून लाखोंची फसवणूक करणारी टोळी शहरात सक्रिय झाली असून, या टोळीतील महिला व पुरुषाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांलाच फसविल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकास अटक केली असून, महिला मात्र फरार आहे.
नाशिक : एकाच शेतजमिनीचे अनेकांना साठेखत करून लाखोंची फसवणूक करणारी टोळी शहरात सक्रिय झाली असून, या टोळीतील महिला व पुरुषाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांलाच फसविल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकास अटक केली असून, महिला मात्र फरार आहे.
याबाबत महेश (सुनील) किसन वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घोटी येथे राहाणारा सुरेश पांडुरंग नागरे याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड येथील सुमारे दीड हेक्टर जमीन विक्री करायची असल्याचे सांगून त्यापोटी एक लाख रुपये रोख घेतले. या जमिनीचा व्यवहार १३ लाख रुपयात ठरला.
व्यवहार पूर्ण करून खरेदीखत करून देण्याचे ठरलेले असताना नागरे याने एक लाख रुपये घेतल्यानंतर खरेदी करून देण्यासाठी टाळाटाळ केली. मात्र त्याचवेळी त्याची
साथीदार असलेली सुरेखा शहा, रा. सातपूर हिच्याशी संगनमत करून
सदर शेतजमिनीचे साठेखत शहा यांना करून दिले व वाजे यांची फसवणूक केली. या प्रकरणी भद्रकाली
पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरेश नागरे यास अटक केली, त्यास न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, नागरेची साथीदार सुरेखा शाह ही फरार असून, पोलीस
तिचा शोध घेत आहेत.
यांच्या संबंधित कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.