सावकाराचा तगादा; रिक्षाचालकाची आत्महत्त्या
By admin | Published: July 3, 2014 12:00 AM2014-07-03T00:00:56+5:302014-07-03T00:22:40+5:30
सावकाराचा तगादा; रिक्षाचालकाची आत्महत्त्या
भगूर : व्याजाच्या पैशासाठी सावकाराने लावलेला तगादा व रिक्षा ओढून नेण्याची धमकी दिल्याने रिक्षाचालकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजवाडा येथे राहणारा रिक्षाचालक कैलास नथू भवार (वय ४०) याने मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन केल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना रात्री अडीच वाजेच्या सुमारास त्याचे निधन झाले.
याबाबत पत्नी अश्विनी भवार हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तीन वर्षांपूर्वी पती कैलास याने दौलत करंजकर याच्याकडून १४ हजार रुपये व्याजाने घेतले होते. मुद्दल व व्याजासह २४ हजार रुपयांची परतफेड केली होती. तरीदेखील करंजकर याने मंगळवारी दुपारी कैलास याच्याकडे आणखीन २४ हजारांची मागणी केली. मला पैसे दे नाही तर तुझी रिक्षा ओढून नेईल, अशी धमकी दिली. करंजकर याच्या पैशाची मागणी व दमदाटीला वैतागून पती कैलास याने विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात करंजकर याच्याविरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)