ई-शॉपीतून कोट्यवधींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:03 AM2018-08-21T02:03:24+5:302018-08-21T02:03:39+5:30
हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर २० लाख रुपयांपर्यंतचा परतावा देण्याचे आमिष दाखवून नाशिक विभागातील हजारो गुंतवणूकदारांची ई-शॉपीच्या संचालकांनी फसवणूक केल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात केली आहे़
नाशिक : हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर २० लाख रुपयांपर्यंतचा परतावा देण्याचे आमिष दाखवून नाशिक विभागातील हजारो गुंतवणूकदारांची ई-शॉपीच्या संचालकांनी फसवणूक केल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात केली आहे़ कंपनीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील, सागर नांद्रे, सुधाकर घोटेकर, दिनेश बाविस्कर, रवि त्रिपाठी यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली असून, या प्रकरणी सोमवारी (दि़ २०) रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात काही महिन्यांपूर्वी संचालक ज्ञानेश्वर पाटील याने ई-शॉपी नावाने कंपनी सुरू केली़ या कंपनीत काही हजार रुपयांची गुुंतवणूक केल्यानंतर वीस लाख रुपयांचा परतावा मिळणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले होते़ त्यामुळे केवळ नाशिक शहरातीलच नव्हे तर धुळे, जळगाव, नंदुरबार यांसह विविध जिल्ह्णांतील गुंतवणूकदारांनी या कंपनीत पैसे गुंतविण्यास सुरुवात केली. कंपनीविषयी गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी शहरातील काही भागात गृहोपयोगी वस्तूंचे मॉलही उभारण्यात आले़ मात्र, गत काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना परतावा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या़
ई-शॉपीच्या संचालकाने कलानगर येथील कार्यालय बंद केल्यानंतर कंपनीने सुरू केलेल्या बापूबंगला येथील मॉलमध्ये गुंतवणूकदारांची गर्दी होऊ लागली. तसेच कंपनीकडून सर्वांचे पैसे दिले जाणार असल्याचे आश्वासन देण्यात येत होते मात्र, अनेक महिने होऊनही तसेच गुंतवलेल्या स्कीमची मुदत संपूनही पैसे मिळत नसल्याचे गुंतवणूकदारांपैकी सुशील भालचंद्र पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून संचालकांच्या विरोधात तक्रार केली आहे़ पाटील यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
गुंतवणूकदारांनी संपर्क साधावा
ई-शॉपीमध्ये हजारो गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ शहरातील ज्या गुंतवणूकदारांची ई-शॉपी कंपनीकडून फसवणूक झाली असेल त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा़
- नारायण न्याहाळदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इंदिरानगर