दुप्पट रक्कमेच्या अमिषाने दिड लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:21 AM2020-10-02T00:21:55+5:302020-10-02T01:32:13+5:30
नाशिकरोड : कंपनीत पैसे गुंतवल्यास सात वर्षात दुप्पट रक्कम मिळेल असे सांगून एका महिलेची १ लाख ६८ हजार रुपयाची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : कंपनीत पैसे गुंतवल्यास सात वर्षात दुप्पट रक्कम मिळेल असे सांगून एका महिलेची १ लाख ६८ हजार रुपयाची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळालीगाव धनगर गल्लीतील सत्यभामा शांताराम घुगरे यांनी दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे की, नोव्हेंबर २००९ मध्ये उपनगर सिंधी कालनीतील सविता विलास कुलथे व दत्तमंदिररोड, धोंगडे मळा येथील मधुमती मनोहर बुचुडे यांच्याशी ओळख झाली. त्या वडाळा शिवारातील एचबीएन डेअरी अन्ड अलाईड लिमीटेड कंपनीत काम करत होत्या. या कंपनीत दरमहा पैसे गुंतविल्यास सात वर्षात दुप्पट रक्कम मिळेल असे सांगून घुगरे यांचा विश्वास त्यांनी संपादन केला. २००९ पासून २०१६ पर्यंत सात वर्षे दर महिन्याला दोन हजार रुपये कंपनीत भरणा करण्यासाठी कुलथे व बुचूडे घेऊन जात होत्या. आतापर्यंत १ लाख ६८ हजार रुपये घेऊन गेल्या आहेत. सात वर्षे पूर्ण झाल्याने घुगरे यांनी या महिलांना विचारणा केली असता त्यांनी तुमचे पैसे श्रीराम चित्ते (भीमनगर, जेलरोड) यांच्याकडे कंपनीत भरणा करण्यासाठी जमा केले आहेत, असे सांगितले. घुगरे यांना संशय आल्यावर त्या विजया ममता थिएटरजवळील कंपनीच्या कार्यालयात गेल्या तेव्हा कार्यालय बंद दिसले. तेथे लिहिलेले फोनंबरही बंद होते. तेथील नागरिकांना विचारणा केली असता कंपनी बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी संशयित सविता कुलथे, मधुमती बुचूडे, श्रीराम चित्ते यांच्याविरुध्द उपनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.