कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:54 AM2020-08-29T00:54:49+5:302020-08-29T00:55:37+5:30
नाशिकरोड : दीनदयाळ बिनभांडवल योजनेतून कर्ज काढून देते असे सांगून १४ महिलांकडून ८२ हजार घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : दीनदयाळ बिनभांडवल योजनेतून कर्ज काढून देते असे सांगून १४ महिलांकडून ८२ हजार घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळालीगाव परिसरातील डोबी मळा येथील आशा सुजित हरिश्चंद्र यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांना घर घेण्यासाठी पैशांची गरज होती. आशा यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्या जयश्री आहिरराव यांना घर घेण्याबाबत सांगितले. जयश्री यांनी कामिनी दीपक शिंदे (रा. पंचशीलनगर, आगरटाकळी रोड) ही कमिशन घेऊन कर्ज काढून देते असे सांगत तिची ओळख करून दिली. कामिनी शिंदेने आशा यांना दीनदयाळ बिनभांडवल योजनेतून पंधरा दिवसात दहा लाखांचे कर्ज काढून देते. बारा हजार कमिशन द्यावे लागेल, असे सांगितले. आशा यांनी कामिनीला २७ व २८ जुलैला सात हजार रोख दिले. त्यानंतर कामिनीकडे कर्जप्रकरणाबाबत विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देत सध्या कर्ज मंजूर केले जात नाही असे सांगितले. कामिनीने संगीता पाटोळे, शैला लोखंडे, कोमल भालेराव, अनिता सोनवणे, मनीषा पवार, ज्योती आबडे, योगीता गायकवाड, सोमनाथ मेधने, लीलाबाई लोखंडे, भारती शेजवळ, कविता वारडे, सोनम गायकवाड, मीना शिरसाठ या महिलांकडूनही ८२ हजार घेतले. मात्र, त्यांनाही कर्ज मंजूर करून न देता फसवणूक केली. याप्रकरणी
उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.