फसवणूक करणाऱ्या ग्रुपचे फुटले पेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:14 AM2020-03-28T00:14:03+5:302020-03-28T00:14:50+5:30
कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे जगभरात निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणाचा काही समाजकंटकांकडून आर्थिक स्वार्थासाठी गैरफायदा घेतला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे ग्रुप तयार करून असे संधीसाधू नागरिकांना आर्थिक मदतीसाठी भावनिक आवाहन करीत फसवणूक करीत असून, सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत अशा फसवणूक करणाºया ग्रुपचे पेव फुटले आहे.
नाशिक : कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे जगभरात निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणाचा काही समाजकंटकांकडून आर्थिक स्वार्थासाठी गैरफायदा घेतला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे ग्रुप तयार करून असे संधीसाधू नागरिकांना आर्थिक मदतीसाठी भावनिक आवाहन करीत फसवणूक करीत असून, सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत अशा फसवणूक करणाºया ग्रुपचे पेव फुटले आहे.
जगभरात एकीकडे कोरोना व्हायरसचा फैलाव होत असताना दुसरीकडे काही समाजकंटक या संकटाच्या परिस्थितीत सोशल मीडियावर वेगवेगळे ग्रुप तयार करून त्यांच्या लिंक शेअर करून सदस्यसंख्या वाढविण्यासोबतच या संकटाच्या काळात मदतीचा बहाणा करून मोबाइल अॅप, बँकेच्या खाते क्रमांकावर आॅनलाइन आर्थिक मदत मागवून आर्थिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सजगता बाळगून कोरोनाविरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता कोशातच आर्थिक मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. यातील बहुतांशी संस्था स्वमालकीच्या साधनांचा वापर करून वंचित, दुर्बल घटकांसाठी खाद्यपदार्थ पुरविण्यासारख्या सेवा देत आहेत. असे करताना त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सीचेही पालन केले जाते. परंतु काही ग्रुप केवळ एकत्र येऊन फोटोसेशन करीत सोशल मीडियावर दिखाऊपणा करीत आर्थिक मदतीचे आवाहन करीत आहेत. त्यांच्याकडून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीही घेतली जात नाही. त्यामुळे त्यांच्यापासून संसर्ग वाढण्याचाच धोका अधिक संभवतो. अशा समाजकंटकांपासून सेवाभावातून देणगी देणाºया नागरिकांनी सावधानता बाळगत जी आर्थिक अथवा अन्य स्वरूपाची मदत करण्याची इच्छा आहे ती शासकीय यंत्रणेला उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे.
शासकीय यंत्रणांची घ्या मदत
कोरोनाच्या संकटाचा गैरफायदा घेत काही संधीसाधू एकत्र येत त्यांच्याकडून आरोग्यसेवा व गरीब गरजूंसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरविल्या जात असल्याचे भासविले जाते. तसे भावनिक संदेशही व्हॉट्सअॅप, फेसबुक, टष्ट्वीटर, टिकटॉक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल माध्यमातून व्हायरल केले जातात. यात संबंधितांचे बँक खात्याशी संलग्न मोबाइल क्रमांकही प्रसिद्ध केले जातात. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसते. त्यामुळे आपल्या मदतीचा कोणीही गैरफायदा घेऊ नये व केलेली मदत गरजवंतांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणेची मदत घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रशासनाकडून मदतकार्यात कार्यरत एनजीओ तसेच स्वयंसेवी दानशूर व्यक्तींनी त्यांची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी समाजाच्या मदतीसाठी पुढे येणे आवश्यक असले तरी अशाप्रकारे समाजसेवेत सहभागी होताना प्रत्येक संस्था तथा व्यक्तींनी त्यांची नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्णातील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने एक गुगल स्प्रेडशीट तयार केले आहे. यात दानशूर व्यक्ती व संस्था लॉगिन करून आपली नोंदणी करू शकतील. दानशूर व्यक्तींची नोंदणी एकाच ठिकाणी व्हावी, त्याची पुनरुक्ती होऊ नये यासाठी डिजिटल स्वरूपात गुगल स्प्रेडशीटचा उपयोग करण्यात येत आहे. यात व्यक्ती, संस्था, मोबाइल क्रमांक, ई-मेल, मदतीचे स्वरूप, वस्तूंचा तपशील, संख्या, ज्या ठिकाणी मदत करावयाची आहे ते ठिकाण, तालुका व मदत पोहोच करण्याची तारीख आपल्या अभिप्रायासह नमूद करावयाची आहे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक