कोरोना बाधितांच्या सेवेसाठी नगरसेवक पावसे यांची मोफत रुग्णवाहिका सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 02:52 PM2020-07-28T14:52:45+5:302020-07-28T14:54:22+5:30
कोरोना बाधित आणि त्यांच्या संपर्कात येणार्या संशयित रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी (दि. २७) येथील उपजिल्हा रुग्णालयात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
सिन्नर : कोरोना बाधित आणि त्यांच्या संपर्कात येणार्या संशयित रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. सोमवारी (दि. २७) येथील उपजिल्हा रुग्णालयात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
तहसीलदार राहुल कोताडे, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. निर्मला गायकवाड, मुख्याधिकारी संजय केदार, डॉ. प्रशांत खैरनार डॉ. सुशील पवार, नगरसेवक प्रमोद चोथवे, शैलेश नाईक, विजय जाधव, श्रीकांत जाधव, ज्योती वामने, रामनाथ पावशे, मेघा पावसे, गौरव घरटे, मंगलाताई शिंदे, बाळासाहेब घुले आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, शहर आणि तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सरदवाडी परिसरातील उपनगरांमध्ये औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार असून त्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. या लागण झालेल्या रुग्णांना तसेच त्यांच्या संपर्कातील संशयित रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय तसेच मुसळगाव येथील इंडियाबुल्स येथील कोवीड रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यासाठी वाहनांची उपलब्धता होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. अनेक खाजगी वाहन चालक भितीपोटी कोरोना संबंधित रुग्ण असल्याने या रुग्णांच्या वाहतुकीसाठी पुढे येत नसत. त्यामुळेच या रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी पुढाकार घेत स्व:खर्चातून रुग्णवाहिका सुविधा सुरू केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या मोफत रुग्णवाहिकेचे उपजिल्हा रुग्णालयात लोकार्पण करण्यात आले.