गृह विलगीकरणातील रुग्णांचा मुक्त संचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:14 AM2021-03-26T04:14:56+5:302021-03-26T04:14:56+5:30
नाशिक : कोरोनाने आतापर्यंतच्या उच्चांकाचे सर्व आकडे मोडीत काढले असतानाही अनेक नागरिकांमधील बेफिकिरी कायम आहे. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा ...
नाशिक : कोरोनाने आतापर्यंतच्या उच्चांकाचे सर्व आकडे मोडीत काढले असतानाही अनेक नागरिकांमधील बेफिकिरी कायम आहे. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांकडून गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला जात आहे. मात्र, गृहविलगीकरणात असणारे अनेक बाधित तसेच काहींचे कुटुंबीयदेखील कोणतीही बाधा नसल्याप्रमाणे मुक्त संचार करीत असतात. गृहविलगीकरणातील या रुग्णांवरील यंत्रणेचे लक्ष नगण्य असल्याने जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने गृहविलगीकरणातील रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हे चिंतेचा विषय ठरू लागले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून, वाढती संख्या पाहता ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांकडून गृहविलगीकरणालाच प्राधान्य दिले जात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच राहून या माध्यमातून उपचार घेण्याची मुभादेखील रुग्णांना आहे. काही लोक खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतात. मात्र, हे करताना गृहविलगीकरण म्हणजे नेमके काय, याचे भान ते विसरून जातात. अनेकांना बाधा असूनही थोडे बरे वाटल्यानंतर अवघ्या तिसऱ्या, चौथ्या दिवशीदेखील ते मुक्तपणे संचार करू लागतात. अशा गृहविलगीकरणातील रुग्णांच्या संपर्कामुळेच अन्य नागरिक बाधित होण्याचा संभव अधिक आहे.
-------------
इन्फो
गृह विलगीकरणातील फरक
सुरुवातीच्या काळात विलगीकरणात ठेवल्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून नियमित दररोज अशा लोकांचा आढावा घेतला जात होता. त्यांच्या घरावर विलगीकरणाचे स्टीकर्स आणि कागदावर माहिती टाकून ते दर्शनी भागात लावले जात होते; मात्र, आता त्याऐवजी थेट सोसायटीवरच कापडी फलक लावले जात असल्याने मोठ्या सोसायटीत नक्की कोण बाधित आणि किती बाधित आहे, ते समजत नाहीत. आता यापैकी एकही यंत्रणा संबंधित रुग्ण खऱ्या अर्थाने विलगीकरणात आहे का, हे जाणून घेण्यासाठी कार्यरत असल्याचे दिसत नाही. रुग्णांची संख्या अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने यंत्रणादेखील अपुरी पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
-------------
इन्फो
८५ टक्के नागरिकांचे घरीच उपचार
बाधित झाल्यानंतर घरीच राहून उपचार घेण्याचा पर्याय ८० टक्क्यांहून अधिक बाधित निवडत आहेत. मात्र, या रुग्णांवर आरोग्य यंत्रणेचे कितपत लक्ष आहे किंवा रुग्ण स्वतः इतर नागरिकांच्या आरोग्याबाबात विचार न करता बेशिस्तपणे सामान्य व्यक्तीप्रमाणे लोकांमध्ये वावरताना दिसतात. स्वतःचा आजार बरा झाल्याच्या भ्रमात आठवड्याच्या आतच बाहेर फिरण्यास प्रारंभ करीत असल्याने इतर लोकांचे आरोग्य धोक्यात टाकत आहेत.
------------
(हा रिॲलिटी चेक आहे. राजू फोटो देणार आहेत.)