संचारबंदीत बेशिस्त नागरिकांचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:47+5:302021-04-16T04:13:47+5:30
पंचवटी : कोरोना विषाणूचा संसर्ग तोडण्यासाठी शहरात जमावबंदी व संचारबंदी लागू केली असताना, पंचवटीत मात्र रात्री या आदेशाचे उघड ...
पंचवटी : कोरोना विषाणूचा संसर्ग तोडण्यासाठी शहरात जमावबंदी व संचारबंदी लागू केली असताना, पंचवटीत मात्र रात्री या आदेशाचे उघड उल्लंघन होत आहे. बेशिस्त नागरिक विशेषतः महिला लहान मुलांना घेऊन रात्री दहा वाजल्यानंतर शतपावलीसाठी घराबाहेर पडत कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत तर दुसरीकडे गावठाण भागातील टवाळखोर चौकाचौकात एकत्र जमून संचारबंदीला आव्हान देत आहेत.
पंचवटीतील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून हे दृष्य दिसत असून, बुधवारी रात्रीपासून संचारबंदी अधिक कडक करूनही काही युवक दुचाकी, चारचाकीचे हॉर्न मोठमोठ्याने वाजवून शांततेचा भंग करत होते. पोलिसांचे वाहन आल्यावर टवाळखोर तेवढ्यापुरता पळ काढत बाजूला निघून गेले. मात्र, पोलीस जाताच पुन्हा एकत्र जमून रात्री उशिरापर्यंत चौकाचौकात ठाण मांडत आहेत.
इन्फो ===
उद्यानात नियमांची पायमल्ली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शासनाने गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लादले आहेत. त्यात मनपा उद्यानांचाही समावेश आहे. उद्यान बंद करण्यात यावे, असे आदेश दिले असले तरी सायंकाळी पंचवटीत असलेल्या बहुतांश उद्यानांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने लहान मुले येत असल्याने उद्यानात उघडपणे कोरोना नियमांची पायमल्ली होत आहे.