गरीब कल्याण योजनेंतर्गत वरखेड्यात मोफत धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 03:53 PM2021-05-30T15:53:47+5:302021-05-30T15:54:21+5:30
वरखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या मोफत तांदूळ व गहू वाटप योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून वरखेडा येथील स्वस्त धान्य दुकानात कोविड संदर्भात सर्व नियमांचे पालन करीत धान्य वाटप करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरिक उपाशी राहू नये यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत दरमाह पाच किलो याप्रमाणे प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना मोफत तांदूळ, गहू देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी या योजनेचा शुभारंभ झाला असून नागरिकांना शासनाचे सर्व नियम पाळून धान्य वाटप करण्यात येत आहे.
गतवर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केसरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत पुन्हा जूनमध्ये अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याचबरोबर आता एपीएल केसरी शिधापत्रिकाधारकांनाही जून महिन्यात प्रत्येकास एक किलो गहू व एक किलो तांदूळ याप्रमाणे दोन किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.