स्वाइन फ्लूचे मिळणार मोफत डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:07 AM2019-07-13T01:07:51+5:302019-07-13T01:08:12+5:30
शहरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून, सात महिन्यात शहरात दहा, तर जिल्ह्यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शासनाच्या साथ रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली,
नाशिक : शहरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून, सात महिन्यात शहरात दहा, तर जिल्ह्यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शासनाच्या साथ रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली, तर दुसरीकडे महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी तातडीने उपाय योजनांचा आराखडा करावा आणि प्रत्यक्ष कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे आदेश महापौरांनी दिले आहेत. तर राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ६५ हजार लसीची खरेदी करण्यात येणार असून, नाशिकमध्येही मोफत लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शहरात गेल्या वर्षी स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव नव्हता. मात्र यंदा जानेवारी महिन्यापासूनच रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. जुलैपर्यंत दीडशे जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, शहरातच दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर साथ रोग नियंत्रण विभागाच्या सहायक संचालक दर्जाच्या अधिकाºयांनी प्रशिक्षण दिले. यावेळी आरोग्य सहसंचालक प्रकाश भोई तसेच नाशिकच्या आरोग्य उपसंचालक रत्ना रावखंडे, राज्य कीटक शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, साथरोग अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्यासह
अन्य मान्यवरांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांना आयएमए सभागृहात मार्गदर्शन केले. स्वाइन फ्लू प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून, खासगी व्यावसायिकांनी उत्पादक कंपन्यांशी चर्चा करून माफक दरात लस उपलब्ध करून द्यावी, असे अधिकाºयांनी सांगितले. स्वाइन फ्लूसंदर्भातील औषधे खासगी वैद्यकीय व्यावसायिक प्रिस्क्रिप्शनद्वारे रुग्णांना देऊ शकतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे कोणत्याही प्रतिबंधाशिवाय रुग्णांना उपचार मिळू शकेल.
दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य व वैद्यकीय विभागाची झाडाझडती घेतली. महापालिकेचे अधिकारी प्रभागात फिरत नाही, आरोग्य तपासणी करीत नाही, घरभेटीचे प्रमाण हे दिसते त्यापेक्षा कमी असावेत अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच प्रशासनावर विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील यांनी टीका केली. रस्त्यात झाडे झुडपे पडून आहेत. कचरा उचलला जात नाही. ब्लॅक स्पॉट ‘जैसे थे’ आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाचे प्रमुखपदाबाबत खो-खो सुरू आहे. कोणतेही अधिकारी प्रत्यक्ष प्रभागात फिरून परिस्थती तपासत नाही यावरून महापौरांसह अन्य गटनेत्यांनी प्रशासनातील अधिकाºयांना धारेवर धरले.
एक महिन्यात एक लाख घरभेटी अशक्यच
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभाग तसेच शासनाच्या आरोग्य विभागाच्या ३०० कर्मचाºयांनी गेल्या महिन्यात १ लाख पाच हजार घरांना भेट देण्यात आल्या. त्यातील ५५९ घरांमध्ये डासअळ्या आढळून आल्या. एक हजार ५५० पाण्याचे साठे तपासण्यात आले. त्यातील ६२० ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळले. त्यात १५३ ठिकाणी महापालिकेने औषध टाकून उत्पत्ती स्थाने नष्ट केली, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी दिली. मात्र, नगरसेवकांनी त्यावर शंका उपस्थित केली. अजय बोरस्ते यांनी, तर एका महिन्यात एक लाख घरांना भेटण्याचा प्रकार अजब असून संबंधितांचा महापलिकेने सत्कार करावा, असे आवाहन केले.
स्वाइन फ्लूचे जानेवारीपासून जुलैपर्यंत १५० रुग्ण आढळले आहेत. यात जानेवारीत ७, फेब्रुवारीत ४२, मार्च ५०, एप्रिल ३७, मे ११ तर जूनमध्ये ३ आणि जुलैत १ रुग्ण आढळला आहे आणि दहा जणांचा मृत्यू झाला आहे.