शिर्डीत फक्त दर्शनार्थींसाठीच मोफत भोजन; प्रसादालय भोजन व्यवस्थेत मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 22:29 IST2025-02-05T22:29:07+5:302025-02-05T22:29:15+5:30

नागरिकांना प्रसादालयात भोजन करण्यासाठी पैसे मोजावे लागणार

Free food only for devotees in Shirdi Big change in Prasadalaya food system | शिर्डीत फक्त दर्शनार्थींसाठीच मोफत भोजन; प्रसादालय भोजन व्यवस्थेत मोठा बदल

शिर्डीत फक्त दर्शनार्थींसाठीच मोफत भोजन; प्रसादालय भोजन व्यवस्थेत मोठा बदल

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारी मोफत भोजन व्यवस्था यापुढे केवळ भाविक व संस्थान रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठीच असेल. अन्य नागरिकांना प्रसादालयात भोजन करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. गुरुवारपासून (दि. ६) या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. भाविकांना प्रसाद भोजन घेणे अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी संगितले.

काही लोक भोजनालयात मद्यपान करून येत असल्याचे, तसेच भोजनानंतर परिसरातच धूम्रपान करत असल्यामुळे साईभक्तांना त्रास होताे. यासारख्या अनेक तक्रारींमुळे प्रशासनाने हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसादालयात सध्या रोज चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेत आहेत.

मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्या बाहेर उदी-प्रसाद वाटप काउंटरजवळ मोफत भोजनाचे कूपन दिले जाईल, ते दाखवून मुख्य प्रसाद भोजन हॉलमध्ये प्रवेश मिळेल. मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मुखदर्शन हॉलमध्ये ऐच्छिक मोफत प्रसाद भोजनाचे तिकीट दिले जाईल, असे गाडीलकर यांनी सांगितले.

संस्थान निवासस्थानातील भाविकांसाठी निवासस्थानातील स्वयंसेवी भोजन कक्षामध्ये रूमची पावती, चावी दाखवून प्रवेश दिला जाईल. रुग्णालयातील नातेवाइकांसाठी केसपेपर, ॲडमिट कार्ड दाखवून द्वारावती भक्तनिवास येथील प्रसाद भोजन कक्ष, मुख्य प्रसादालयात प्रवेश दिला जाईल. शालेय सहली, पालखी पदयात्रींसाठी प्रसादालय अधीक्षक खातरजमा करून विद्यार्थ्यांना, पदयात्रींना लेखी पत्र घेऊन प्रवेश देतील. नाश्ता पाकिटाचे कुपनही सकाळी दर्शनरांगेत देण्यात येणार आहेत. ते कूपन संबंधित काउंटरवर दाखवून तेथे पैसे भरून नाश्ता पाकीट मिळेल.

मोफत भोजन व्यवस्थेमुळे शिर्डीत भिक्षेकरी व गुन्हेगार वाढल्याने भाविकांशिवाय इतरांसाठी मोफत भोजन बंद करावे, अशी मागणी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

Web Title: Free food only for devotees in Shirdi Big change in Prasadalaya food system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.