लॉकडाऊनमध्ये कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:13 AM2021-05-23T04:13:41+5:302021-05-23T04:13:41+5:30
नाशिक : राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. या योजनेत अंत्योदय ...
नाशिक : राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. या योजनेत अंत्योदय तसेच प्राधान्यक्रम कुटुंब कार्डधारकांना मोफत धान्यवाटप केेले जात असल्याने रेशन दुकानांसमोर सध्या रांगा लागल्याचे दिसत आहे. दरम्यान, काही तालुक्यांमध्ये भरडधान्यांचे वाटप केेले जात आहे.
राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्यात आलेले आहेत. यामुळे सर्वसामान्य, गरीब नागरिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना राज्य शासनाच्या वतीने मोफत गहू, तांदूळ वाटप केला जात आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून मे महिन्यांसाठी रेशनच्या धान्याचे मोफत वाटप केले जात आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी २५ किलो गहू प्रतिकार्ड, १० किलो तांदूळ प्रतिकार्ड मोफत वाटप केले जात आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ आणि एक किलो डाळ अतिरिक्त मोफत वाटप केले जात आहे.
प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थींसाठी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अतिरिक्त तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ, तसेच एक किलो डाळ याप्रमाणे मोफत दिली जात आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारक १,७२,३४८ तर प्राधान्यक्रम कुटुंबातील २८,२५,१३६ सदस्यांना लाभ होत आहे.
--इन्फो--
जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असल्याने अनेक ठिकाणी सकाळी ७.३० ते दुपारी ११ वाजेपर्यंतच रेशनची दुकाने सुरू ठेवली जात असल्याने सकाळपासूनच कार्डधारकांच्या रेशन दुकानांसमोर रांगा लागतात. राष्ट्रीय अन्नसुरक्षेंतर्गत मिळणारे नियमित धान्य मोफत दिले जात असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतूनही मोफतचे धान्य वितरित केले जात असल्याने लॉकडाऊनच्या काळात अनेकांना अन्नधान्याचा आधार झाला आहे.
--इन्फो--
नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गहूऐवजी भरडधान्ये (मका, ज्वारी, बाजरी) यांचे वाटप करण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत डाळ ज्या दुकानात शिल्लक आहे अशा दुकानांमध्ये प्रथम येणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थींना डाळींचे वाटप केले जात आहे. त्यानंतर डाळ शिल्लक असली तरी प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थींना वाटप करण्यात येत आहे.