बॅँकांना सलग सुटी मग..., पोस्टाची ‘आयपीपीबी’ देणार मोफत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 03:18 PM2020-02-19T15:18:52+5:302020-02-19T15:20:11+5:30
इंडिया पोस्ट पेमेंट बॅँकेत आपले बचत व वैयक्तिक खाते उघडण्यासाठी केवळ आधारकार्ड असणे गरजेचे असते. ‘आपका बॅँक आपके द्वार’ असे ब्रिद घेऊन कार्यरत असलेल्या टपाल खात्याच्या या बॅँके च्या देशभरात ६५० शाखा
नाशिक : भारत सरकारने भारतीय टपाल खात्याला उर्जितावस्था प्राप्त करून देत बॅँकिंग क्षेत्रात पुढे आणण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक (आयपीपीबी) सुरू केली आहे. या बॅँकेच्या नाशिक शाखेच्या वतीने येत्या शनिवारपर्यंत (दि.२२) ‘आधार संलग्न भरपाई सेवा आठवडा’ राबविला जात आहे. यामाध्यमातून पोस्टाचे ग्राहक तसेच अन्य बॅँकांच्या ग्राहकांनासुध्दा पोस्ट कार्यालयात सुटीच्या दिवशीही जाऊन सहजरित्या बॅँकिंगचे सर्व व्यवहार करता येणार असल्याची माहिती नाशिक विभागाचे आयपीपीबीचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेंद्र अघाव यांनी दिली.
इंडिया पोस्ट पेमेंट बॅँकेत आपले बचत व वैयक्तिक खाते उघडण्यासाठी केवळ आधारकार्ड असणे गरजेचे असते. ‘आपका बॅँक आपके द्वार’ असे ब्रिद घेऊन कार्यरत असलेल्या टपाल खात्याच्या या बॅँके च्या देशभरात ६५० शाखा अस्तित्वात आल्या आहेत. टपाल कार्यालयांमधून या शाखांचे कामकाज सध्यस्थितीत सुरू आहे. कुठलेही अतिरिक्त शुल्क न भरता या बॅँकेच्या शाखेतून नागरिक दुसऱ्या बॅँकेंशी आपले आर्थिक व्यवहार करू शकतात; मात्र एका व्यवहाराची मर्यादा १० हजारापर्यंत असल्याचे अघाव यांनी सांगितले. बुधवारी शिवजयंती शुक्रवारी महाशिवरात्री आणि चौथा शनिवार यामुळे राष्टÑीयकृत बॅँकांसह अन्य खासगी बॅँकांनाही सुटी राहणार आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ शकते, हे लक्षात घेऊन टपाल विभागाकडून आधार संलग्न भरपाई सेवा आठवडा शनिवारपर्यंत राबविला जात आहे. याअंतर्गत नागरिक टपाल कार्यालयात जाऊन सहजरित्या आयपीपीबीच्या शाखेतून मोफत आॅनलाइन बॅँकींग व्यवहार (एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस) अगदी सुरक्षितरित्या करू शकतात. तसेच टपालाच्या ग्राहकांना सहजरित्या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे टपालाच्या आरडी, सुकन्या समृध्दी, पीपीएफ खात्यात आॅनलाइन रकमेचा भरणा करता येणार आहे.
...अशा आहेत नाशिकमधील शाखा
नाशिक मुख्य शाखेअंतर्गत इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, नाशिक तालुका, निफाडचा काही भागातील टपाल कार्यालयांचा समावेश होतो. या सर्व खात्यात आयपीपीबीच्या सेवा नागरिकांना घेता येणार आहे. नाशिक शहरातील मुख्य टपाल कार्यालय, शहर टपाल कार्यालय, अंबड, भगूर, भाऊसाहेबनगर, चांदोरी, देवळाली, मेरी कॉलनी या टपाल शाखा कार्यालयांमध्येही बॅँकींग व्यवहार करता येणार आहे. सार्वजनिक सुटीच्या दिवशीही टपाल कार्यालयात आयपीपीबीच्या शाखा सुरू राहणार असल्याचे अघाव म्हणाले.