कारगिल विजयानिमित्त शहरात ‘उरी...’चे मोफत प्रक्षेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:10 AM2019-07-25T01:10:15+5:302019-07-25T01:11:03+5:30
२६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी अभिमानाचा दिवस. यादिवशी भारताने कारगिल युद्धात विजयाचा ध्वज फडकाविला होता. या विजयाची आठवण करून देणारा ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट शुक्रवारी (दि.२६) सकाळी १० वाजता देशभरातील चित्रपटगृहांतून मोफत प्रसारित केला जाणार आहे.
नाशिक : २६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी अभिमानाचा दिवस. यादिवशी भारताने कारगिल युद्धात विजयाचा ध्वज फडकाविला होता. या विजयाची आठवण करून देणारा ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट शुक्रवारी (दि.२६) सकाळी १० वाजता देशभरातील चित्रपटगृहांतून मोफत प्रसारित केला जाणार आहे. भारताच्या ‘कारगिल विजय दिनाची’ आठवण म्हणून तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी नाशिकमध्येदेखील या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्यांबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वाढावा, याकरिता माजी सैनिक कल्याण विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शानाखाली येत्या २६ रोजी सकाळी १० वाजता ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाचे प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे. १८ ते २५ वयोगटातील युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्माते, वितरक आणि राज्यातील चित्रपटगृह मालक संघटना यांच्या समवेत झालेल्या बैठकीत या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्यास निर्माते, वितरकांनी अनुमती दर्शविलेली आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी येत्या शुक्रवारी चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
शासकीय कार्यालयांमधील सर्व अधिकारी या चित्रपटाचा आनंद घेणार आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून पासेसदेखील वितरित करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी आपल्या आप्तेष्ट आणि मित्रपरिवारालादेखील तिकिटांचे वाटप केले आहे. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे स्वत: हा चित्रपट पाहण्यासाठी जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमधून पासेस
तरुणांना आकर्षित करण्यासाठी सदर विशेष चित्रपट दाखविण्यात येणार असल्याने शहरातील महाविद्यालयीन तरुणांना या चित्रपटाच्या मोफत पासचे वाटप प्राचार्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. सध्या भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटालादेखील महत्त्व प्राप्त झाले आहे.