ठाणगाव येथे बिबट्याचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 07:07 PM2018-09-18T19:07:06+5:302018-09-18T19:07:33+5:30
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव शिवारातील मारुतीचा मोडा परिसर व आडवाडी रस्त्यालगत असलेल्या बेल टेकडी भागात दिवसा बिबट्याचे दर्शन होत आहे. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव शिवारातील मारुतीचा मोडा परिसर व आडवाडी रस्त्यालगत असलेल्या बेल टेकडी भागात दिवसा बिबट्याचे दर्शन होत आहे. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
मारुतीचा मोडा परिसरात जंगलात वृक्षाचे प्रमाण जास्त असल्याने या भागात वन्यप्राण्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा आहे. परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने जंगलातील मोर, बिबटे, तरस, लांडगे आदी वन्य प्राणी दिवसाही पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहे. शेतकरी दिवसभर शेतात काम करतांना आपला जीव मुठीत धरु न काम करतात. मोडा परिसरातील शिवाची नळी परिसरात बिबट्याची दहशत दिवसाही दिसत आहे. याच भागात मोरांचे प्रमाण जास्त असून बिबटेही दिवसा या भागात पाण्याच्या शोधार्थ भटकंती करतांना दिसत आहे. या भागात शेतमजूर कामासाठी जाण्यासाठी धजावत नाही. जास्त रोजदारी दिली तरीही मजूर या भागात कामासाठी जात नाही. उन्हाच्या तीव्रतेने बिबटे जंगला बाहेर येत आहे. आडवाडी रोडलगत बेल टेकडी परिसरात डोंगराला कपार असल्याने कपारीत बिबट्याचे वास्तव्य त्या भागात कायम असून शेतकरी आपला जीव मुठीत धरु न शेतात काम करत आहे. वनविभागाच्यावतीने या दोन्ही ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहे.
वनविभागाचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये घबराट
मारु तीचा मोडा परिसरातील शिवाची नळी भागात बिबटे व वन्य प्राण्यांना पिण्यासाठी ठिकठिकाणी पाणवठे उभारले तर दिवसाढवळ्या बिबटे मानवी वस्तीकडे चाल करणार नाहीत. ऐन पावसाळ्यात बिबट्यासाठी पाणवठे उभारण्याची मागणी होत आहे. वनविभागाच्या वतीने पाणवठे उभारून त्यावर देखरेखीसाठी मजुराची नियुक्ती केली तर परिसरातील जंगलतोड करणाऱ्यावर नियंत्रण येईल व बिबट्यासाठी पाण्याची सोय झाल्याने बिबटे देखील मानवी वस्तीकडे फिरकणार नाही, यासाठी वनविभागाने पाऊले उचलावी अशी मागणी करण्यात येत आहे.