आहुर्ली परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार, नागरिकांमध्ये दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 11:22 PM2020-12-08T23:22:30+5:302020-12-09T20:50:27+5:30
आहुर्ली : परिसरात बिबट्याचा पुन्हा एकदा मुक्तसंचार सुरू झाला असून, अनेकांना या बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली आहे. दरम्यान, रात्रीचे बाहेर फिरणे शेतकऱ्यांना भितीदायक झाले असून वनविभागाचे वतीने गस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.
आहुर्ली : परिसरात बिबट्याचा पुन्हा एकदा मुक्तसंचार सुरू झाला असून, अनेकांना या बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली आहे. दरम्यान, रात्रीचे बाहेर फिरणे शेतकऱ्यांना भितीदायक झाले असून वनविभागाचे वतीने गस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या पिंपळगाव मोर, टाकेद परिसरात बिबट्याचा धुमाकूळ ताजा असतानाच आहुर्ली परिसरातील बिबट्याच्या मुक्त वावराच्या घटनेने नागरिकांवर दहशतीचे सावट पसरले आहे.
पिंपळगाव मोर परिसरात या बिबट्याने लहान मुलीचा बळी घेतल्याच्या घटनेमुळे नागरिक ही घाबरले असून, शेतीला पाणी देणे वैगेरेची कामे रात्री वीज येत असल्याने नाईलाजाने करावी? लागतात, ती आता कामे कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
साधारणतः चार-सहा महिन्यांपूर्वी ही सांजेगाव परिसरात बिबट्याच्या मुक्तसंचाराने धूम माजवली होती. त्यावेळी नागरिक व प्रसारमाध्यमांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून सापळा रचण्यात आला होता. यात एक बिबट्या ही जेरबंद झाला होता.
दरम्यान, नागरिक याप्रकारानंतर मोकळा श्वास घेत नाही तोच पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन व मुक्तसंचार यामुळे नागरिक पुन्हा दहशतीच्या सावटाखाली आले आहेत.
दरम्यान, पिंपळगाव मोरप्रमाणे एखादी दुर्घटना घडण्याअगोदरच वनविभागाच्या वतीने दक्षता घेण्यात यावी, गस्तिपथकाचे माध्यमातून या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बहुतांश शेतकऱ्यांची वस्ती ही शेतातील शिवारात लांब लांब अंतरावर व एकटी दुकटी आहे. आहुर्ली परिसर व परिसरातील अनेक गावे ही धरणाच्या काठावर वसलेली असून वस्ती ही धरणाच्या जवळपास आहे. पाणी पिण्यासाठी बिबट्या नेहमीच या धरणावर ये-जा करत असल्याने त्याच्या मार्गावरील शेतकऱ्यांची वस्ती असणारे नागरिक धास्तावले आहेत.
बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांना मळ्याच्या वस्तीत जीव मुठीत धरून रहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी पाणी भरणे आदी कामे नाईलाजाने करावी लागत आहे.
- दत्तू पा. गायकर, नागरिक, आहुर्ली