मांजरपाड्याचा मार्ग मोकळा
By admin | Published: March 23, 2017 01:31 AM2017-03-23T01:31:55+5:302017-03-23T01:32:16+5:30
येवला : आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे मांजरपाडा प्रकल्पाच्या शिल्लक निधी खर्चास शासनाने मंजुरी दिली असून,बंद पडलेले काम आता सुरु होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
येवला : आमदार छगन भुजबळ यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे मांजरपाडा प्रकल्पाच्या शिल्लक निधी खर्चास शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून, या प्रकल्पाचे बंद पडलेले काम आता तातडीने सुरु होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्यस्थितीत मांजरपाडा योजनेत ८.९६ किमी लांबीच्या बोगद्यापैकी ८६ टक्के, तर धरण आणि सांडव्याचे ६० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे अडवून हे पाणी बोगद्याद्वारे गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार असल्यामुळे या योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता किंवा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येऊन या योजनेचे काम सुरु करावे, अशी आमदार छगन भुजबळ यांच्यासह स्थानिक संघर्ष समितीने केली होती. या महत्वकांक्षी वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील गुजरातच्या हद्दीवरील पाणलोट क्षेत्रातील पश्चिमवाहिनी नद्यांचे गुजरातकडे आणि अरबी समुद्रात वाहून जाणारे ८४५ दलघफु पाणी आडवुन हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे. यातील १०० दलघफु पाणी स्थानिक वापरसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. मागील वर्षी शासनाने ७० कोटींपैकी सुमारे ४०कोटी निधी राज्यातील दुसऱ्या प्रकल्पांसाठी वर्ग केला होता. सध्यस्थितित या प्रकल्पसाठी ३३ कोटी निधि शिल्लक असुन १८ मार्च रोजी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात उर्ध्व गोदावरीसाठी ३८.३५ कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतांना या योजनेचे काम तातडीने सुरु केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी आमदार भुजबळ यांना आश्वासन दिले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या प्रकल्पस्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी सुद्धा केली आहे. केवळ बोगद्याचे काम जरी पूर्ण झाले तरी गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार असल्यामुळे या योजनेसाठी भुजबळांचा पाठपुरावा सुरु होता. याबाबत भुजबळ यांनी यापूर्वी आर्थर रोड कारागृहामधुन मुख्यमंत्र्यांना स्वहस्ताक्षरात पत्रसुद्धा लिहिले होते. आता राज्य शासनाने शिल्लक असलेल्या ३३ कोटी रु पयांच्या निधी खर्चास मंजुरी दिल्यामुळे लवकरच मांजरपाडा प्रकल्पाचे काम सुरु होण्याची अशा आहे. येवला तलुक्यासह दिंडोरी, निफाड आणि चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे लाभ होणार आहे. (वार्ताहर)