मोदी यांच्याविरोधात ‘आप’चा मोफत चहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:43 AM2019-02-09T00:43:26+5:302019-02-09T00:44:00+5:30
‘दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार’ असे आश्वासन देत मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले होते. परंतु साडेचार वर्षे उलटूनही हे सरकार ना रोजगार, ना उद्योगपूरक शासकीय योजना राबवित आहे, असा आरोप करीत आम आदमी पार्टीच्या नाशिकमधून युवा आघाडीने शालिमार परिसरात सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीसह ‘चहा व पकोड्यांचे’ मोफत वाटप करीत आंदोलन केले.
नाशिक : ‘दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार’ असे आश्वासन देत मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले होते. परंतु साडेचार वर्षे उलटूनही हे सरकार ना रोजगार, ना उद्योगपूरक शासकीय योजना राबवित आहे, असा आरोप करीत आम आदमी पार्टीच्या नाशिकमधून युवा आघाडीने शालिमार परिसरात सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीसह ‘चहा व पकोड्यांचे’ मोफत वाटप करीत आंदोलन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी युवकांना २ कोटी रोजगार देण्याचे वचन दिले होते. परंतु नवीन रोजगार निर्माण झालेच नाही, शिवाय नोटबंदी, जीएसटीच्या तुघलकी निर्णयाने अनेक रोजगार बुडाल्याचा आरोप आपच्या युवा आघाडीने केला आहे. आता प्रधानमंत्री युवकांना पकोडे विकून रोजगार मिळविण्याचे सल्ले देत आहेत. याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीने डॉक्टर, वकील, इंजिनियर यांची वेशभूषा करून कार्यकर्त्यांनी नागरिकांना मोफत चहाचे वाटप केले. तसेच मोदी-फडणवीस हाय हाय, नोकरी नाही-रोजगार नाही या सरकारला लाज नाही, रोजगार न देणाऱ्या सरकारचा निषेध असो, भाई मांगे-नोकरी; बहन मांगे नोकरी, मालाला दाम-हाताला काम मिळालंच पाहिजे यांसारख्या घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी अॅड. प्रभाकर वायचळे, युवाध्यक्ष योगेश कापसे, जितेंद्र भावे, स्वप्नील घिया, एकनाथ सावळे, अनिल कौशिक, अल्ताफ शेख, महेंद्र मगर, सुमित शर्मा, अल्बाशी शेख, साहिल सिंग, शुभम पडवळ, रमेश मराठे काका, विनायक येवले, विश्वजित सावंत आदी उपस्थित होते.