शिक्षकांना कोरोना जबाबदारीतून मुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:17 AM2021-05-21T04:17:05+5:302021-05-21T04:17:05+5:30
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील जवळपास ८७० शिक्षक मार्च २०२० पासून आरोग्य विभागासोबत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. ...
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील जवळपास ८७० शिक्षक मार्च २०२० पासून आरोग्य विभागासोबत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यात निवारा शेड ड्युटी, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, शाळाबाह्य मुले सर्वेक्षण, पॉझिटिव्ह कोरोना पेशंट कान्ट्रॅक्ट ट्रेसिंग सर्व्हे, अँटिजन टेस्ट, लसीकरण केंद्र येथे राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत. त्यात १५० शिक्षक व त्यांचे कुटुंबीय कोरोनाग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे कोरोना सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकाचा विमा व दुर्दैवाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या वारसदारास ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्यात यावे.
तसेच सद्य:स्थितीतही महानगरपालिका शिक्षण विभागातील शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण देणे, शालेय पोषण आहार वितरण, शाळाबाह्य व दाखलपात्र मुलांचे सर्वेक्षण करून प्रवेश देणे, विद्यार्थ्यांचे निकालपत्रक तयार करणे या जबाबदाऱ्यांसह विविध विभागांत नेमून दिलेल्या जबाबदाऱ्याही प्रामाणिकपणे कोणतीही सुटी न घेता पार पाडत आहेत शिवाय शालाबाह्य व दाखलपात्र मुलांचे सर्वेक्षण करून प्रवेश देणे, शालेय पूर्वतयारी करणे, जुनी पाठ्यपुस्तके जमा करणे, नवीन पाठ्यपुस्तके ताब्यात घेऊन वाटपाचे नियोजन करणे आदींसह शाळापूर्व कामे करावयाची असल्याने सर्व शिक्षकांना कोरोना जबाबदारीतून कार्यमुक्त करावे, अशी मागणी महापालिका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने मोतीराम पवार, बाळासाहेब कडलग, बाळासाहेब सातपुते, प्रकाश शेवाळे, राजीव दातीर,नानकर आदींनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
(फोटो २० टीचर) - शिक्षकांना कोरोना जबाबदारीतून मुक्त करण्याच्या मागणीचे निवेदन मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांना देताना मोतीराम पवार, बाळासाहेब कडलग, बाळासाहेब सातपुते, प्रकाश शेवाळे, राजीव दातीर, आदी.