कळवण येथे कौशल्यविकासचे मोफत प्रशिक्षण
By admin | Published: August 1, 2016 12:15 AM2016-08-01T00:15:01+5:302016-08-01T00:15:20+5:30
कळवण येथे कौशल्यविकासचे मोफत प्रशिक्षण
कळवण : केंद्र सरकारने प्रमोद महाजन कौशल्यविकास आणि उद्योजकता विभागामार्फत मानूर येथील स्वामी विवेकानंद औद्योगिक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक अप्लायन्सेस व वेल्डर या दोन व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दगडू रामचंद्र सोनवणे यांनी दिली.
खेडेगावातील तरुणांचे लोंढे रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे गाव ओस पडू लागली आहेत, तर शहरातील गर्दी वाढत आहे. खेड्ड्यातील सुशितक्षत बेरोजगार तरुणांना स्थानिक ठिकाणीच स्वत:चा रोजगार सुरु करता यावा. यासाठी केंद्र शासनाने प्रमोद महाजन कौशल्यविकास आणि उद्योजकता विभागाअंतर्गत ‘कौशल्य विकास’ कार्यक्रम हाती घेतला आहे.
या कार्यक्र माअंतर्गत मानूर येथील स्वामी विवेकानंद औद्योगिक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्र येथे इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक अप्लायन्सेस (घरातील सर्व विद्युत उपकरणे दुरूस्ती) व वेल्डर (आर्क अॅण्ड गॅस वेल्डर ) हे दोन व्यवसाय अभ्यासक्रम सरू झालेले आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमाचा कालावधी ७ ते ८ महिन्यांचा असून, हे प्रशिक्षण कौशल्यविकास योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत आहे.
कळवण तालुक्यातील आठवी, नववी व दहावी पास व नापास विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. इच्छुकांनी प्रवेश व अधिक माहितीसाठी ९७६६८५३५८६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. प्रवेश घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखल, पासपोर्ट साईज फोटो, मार्कशीट, रहिवाशी दाखला आदी कागदपत्रांची पुर्तता करावी असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)