ठाणगाव परिसरात बिबट्याच्या जोडीचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 05:47 PM2019-11-25T17:47:32+5:302019-11-25T17:48:40+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव परिसरात बिबट्याच्या जोडीची दहशत वाढली असून त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
मारुतीचा मोढा परिसरातील शिवाच्या नळी परिसरात बिबट्याच्या जोडीचे वास्तव्य असून शेतकऱ्यांना सायंकाळी पाच वाजताच घरी यावे लागत आहे. पाच वाजेनंतर बिबट्यांच्या डरकाळ्या ऐकू येतात. त्यामुळे शेतात काम करण्यासाठी मजूर त्याभागात जाण्यास सहसा तयार होत नाही. शेतकºयांची सध्या कांदा लागवड सुरु असून दिवसा वीज नसल्याने शेतकरी रात्री कांदा पिकांस पाणी देण्यासाठी गेले तर जीव मुठीत धरु न व सोबतीला दोन-तीन लोकांना घेऊन पाणी भरावे लागत आहे. दोन बिबटे असल्याने ते दोघेही वेगवेगळ्या भागात दिसून येतात, त्यामुळे शेतकरी भयभीत झालेले आहेत. सायंकाळी पाच वाजेनंतर त्यांच्या डरकाळ्यांनी परिसर दणाणून जातो. पाणी व अन्नाच्या शोधासाठी ते मानवी वस्तीकडे येतात. त्यामुळे शिवाची नळी, उपळी परिसर व केशर या भागात दहशत पसरली आहे. बिबट्याचे दर्शन झाल्यास फटाके फोडण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.