चाचणीसाठी आठशे प्रवाशांना फुकटात प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:20+5:302021-07-01T04:12:20+5:30
महापालिकेने गेल्या आठवड्यात ड्राय रन घेतली होती. त्यानंतर महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीच्या संचालकांची गेल्या आठवड्यात बैठक झाली. ...
महापालिकेने गेल्या आठवड्यात ड्राय रन घेतली होती. त्यानंतर महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीच्या संचालकांची गेल्या आठवड्यात बैठक झाली. यात १ ते १० जुलैदरम्यान बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या बस स्थानकाची पायाभूत कामे वगळता, बस ऑपरेशनसाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. बुधवारी (दि. ३०) पंचवटी (तपोवन) डेपोतून पाच, तर नाशिकरोड येथील डेपोतून चार बसेस, अशा एकूण नऊ बसेस नऊ प्रमुख मार्गांवर नेण्यात आल्या. सकाळी सात ते दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण आठशे प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. यावेळी विविध मार्गांवर बस सुरू करताना त्यासाठी लागणारा वेळ तसेच तिकीट मशिनद्वारे तिकीट व्यवस्थित देता येते किंवा नाही, तसेच थांब्यांमधील अंतर तपासणी करण्यात आली. विविध थांब्यांवर थांबलेल्या बसमध्ये प्रवाशांची वाहतूक करण्यात आली आणि त्यांना तिकिटेही देण्यात आली. मात्र, ती नि:शुल्क होती.
महापालिकेने इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा या सेवेत वापर केला आहे. त्यामुळे बसला जीपीएस बसविण्यात आले असून ठराविक वेळेत ती बस त्या थांब्यावर थांबणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने चाचणी करण्यात आली. बहुतांश सर्वच यंत्रणा सुरळीत असल्याचे आढळले आहे.
इन्फो...
प्रवाशांना मोफत प्रवासाचा सुखद धक्का
राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा नसल्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना रिक्षाशिवाय पर्याय राहिलेला नाही. अशावेळी बुधवारी (दि. ३०) अचानक महापालिकेची बस मदतीला धावून आली. प्रवाशांना तिकीट दिले, परंतु तेही मोफत! त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आता लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
इन्फो..
अद्ययावत नियंत्रण कक्ष
महापालिकेच्या बसेससाठी गोल्फ क्लब येथे बस सेवेचे ऑफिस सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणाहून कोणत्याही बस चालकाला संपर्क साधून सूचना केली जाऊ शकते. द्वारका चौकात आंदोलनामुळे रस्ता बंद असेल, तर अगोदरच सूचना देऊन ही बस अन्य मार्गाने नेता येऊ शकते.
इन्फो...
संकटकालीन पॅनिक बटण
सिटी लिंक अत्यंत आधुनिक आहे. स्वयंचलित दरवाजे असून बसमध्ये पब्लिक ॲड्रेस सिस्टिम्स, पुढे कोणता थांबा येणार आहे, त्याची आगाऊ ध्वनी संदेश देणारी यंत्रणा बसमध्ये आहे. याशिवाय आपत्कालीन प्रसंगासाठी पॅनिक बटण देखील आहे. तसेच याच बसमध्ये सीसीटीव्ही आणि हेड कॅप्चर कॅमेरेही आहेत.