मोसम, आराम नद्यांवर बंधाऱ्यांचा मार्ग मोकळा
By admin | Published: April 11, 2017 12:19 AM2017-04-11T00:19:39+5:302017-04-11T00:19:51+5:30
द्याने : बागलाण तालुक्यातील मोसम, आरम, कान्हेरी व हत्ती या नद्यांवर बंधारे बांधण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
द्याने : बागलाण तालुक्यातील मोसम, आरम, कान्हेरी व हत्ती या नद्यांवर बंधारे बांधण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. जलसंपदा विभागाचे उपसचिव एस.ए. टाटू यांनी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश (नाशिक) यांना आदेश दिले. यामुळे नद्यांवर पाच दशलक्ष घनफूट क्षमतेपर्यंतचे बंधारे बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या मागणीला पालकमंत्री गिरीश महजन यांच्या मंजुरीसाठी कृउबा संचालक डॉ. दिकपाल गिरासे यांनी पाठपुरावा केला. नद्यांवर ज्या भागात खडक असेल तेथे तांत्रिकदृष्ट्या पाया बांधून पाणी अडविणे शक्य आहे. याठिकाणी बंधारे बांधता येणार आहेत. धरणाच्या नियोजित सिंचनावर परिणाम न होता पावसाळ्यातील पूरपाणी बंधाऱ्यांमध्ये अडविता येणार आहे. याचा फायदा त्या क्षेत्रातील शेतजमीनींना होणार आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याचबरोबर अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे.
मोसम नदीवरील ब्राह्मणपाडे, वाघळे, मोराने व अंबासन येथील ब्रिटीशकालीन बंधाऱ्यांची अवस्था प्रत्यक्ष दाखविल्यानंतर गिरीश महाजन यांनी हे सर्व विषय मार्गी लावण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. यासाठीचे शिफारसपत्र डॉ. सुभाष भामरे यांनी सादर केल्यावर त्या कामांची देखील प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात आहे.
भाजपा सरकारने या भागातील सिंचन व पाणीप्रश्न सोडविण्यास किटबद्ध आहे. असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी पर्यटन मंत्री व निवडणूक प्रभारी जयकुमार रावल यांनी जनतेला सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू असा शब्द दिला होता. त्याचीच हि पूर्तता आहे. (वार्ताहर)