अनिष्ट प्रथांच्या जोखडातून महिला मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 11:28 PM2019-08-22T23:28:28+5:302019-08-23T00:33:35+5:30
एकेकाळी राजेशाही व जहागिरी उपभोगलेल्या देशमुख मराठा समाजातील महिलांना आजही अनेक प्रकारच्या सामाजिक बंधनात राहावे लागत होते. तथापि, सामाजिक कार्यकर्ते, सिन्नर तालुका देशमुख यांच्या पुढाकाराने व अध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने समाजातील महिला व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारी पारंपरिक बंधने तोडण्यात आली आहेत.
सिन्नर : एकेकाळी राजेशाही व जहागिरी उपभोगलेल्या देशमुख मराठा समाजातील महिलांना आजही अनेक प्रकारच्या सामाजिक बंधनात राहावे लागत होते. तथापि, सामाजिक कार्यकर्ते, सिन्नर तालुका देशमुख यांच्या पुढाकाराने व अध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने समाजातील महिला व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारी पारंपरिक बंधने तोडण्यात आली आहेत. विद्यार्थी गुणगौरव सोहळा व समाजाच्या मेळाव्यात निर्णय जाहीर करण्यात आले. त्यामुळे देशमुख समाजात परंपरेने चालत आलेल्या चालीरीतींच्या जोखडातून महिलांची मुक्तता झाली आहे.
सिन्नर शहरातील देशमुख मराठा समाजाचा मेळावा व विद्यार्थी आणि सेवानिवृत्त समाजबांधव सत्कार सोहळा गुरुवारी भगवती मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, प्रा. डॉ. लता देशमुख, नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख, नगरसेवक वासंती देशमुख, समाजाचे उपाध्यक्ष संतोष देशमुख, बाळासाहेब देशमुख उपस्थित होते. सिन्नरमधील देशमुख समाजाने महिलांविषयी घेतलेले निर्णय अत्यंत कौतुकास्पद असून, काळानुसार बदललेच पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. देशमुख यांनी केले. तसेच समाजातील विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षणाची कास धरावी, असे आवाहन केले.
अध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी संमेलनात गत चार वर्षांपासून महिलावर्गास प्रथम जेवण करण्याची पद्धतदेखील सुरू केली असून, समाजात यापुढे अंत्यसंस्कार होत असताना पार्थिवाची आरती करण्याची पद्धत बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. विकास करायचा असेल तर काळानुसार बदलले पाहिजे, तसेच घरात उच्चशिक्षित सून म्हणून पाहिजे असते. मात्र, तरीदेखील लोक काय म्हणतील म्हणून महिलांना अनेक गोष्टींपासून रोखत असतो, ही बाब योग्य नाही, असे सचिव अभिजित देशमुख यांनी सांगितले.
समाजात महिलांना साडीव्यतिरिक्त ड्रेस परिधान करण्याचीदेखील परवानगी समाजाच्या वतीने देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी जाहीर केली. दत्तात्रय देशमुख, सागर देशमुख, गिरीश देशमुख यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
ज्या महिलांना आप्तेष्टांच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हायचे असल्यास समाजाला त्याबाबत हरकत
नसेल तसेच सक्तीदेखील केली जाणार नाही, असाही निर्णय घेण्यात आला. दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात जाण्यासाठी महिलांना अनुमती देण्यात आली.
घुंगटबंदीचा स्तुत्य निर्णय
समाजात आजही ज्येष्ठ महिला घुंगट पद्धतीचे पालन करतात. तसेच कुटुंबात येणाऱ्या सूनबाईनेही या प्रथेचे पालन करावे, असा त्यांना आग्रह असतो. नवीन सुना उच्चशिक्षित असूनही त्यांच्यावर घुंगट पद्धतीचे पालन करण्याची अपेक्षा केली जाते; परंतु यापुढे समाजात घुंगटबंदी करण्याचा निर्णय
घेण्यात आला.