राज्यराणी एक्स्प्रेसला वारंवार विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:34 PM2020-02-13T23:34:18+5:302020-02-14T00:52:58+5:30
नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला वारंवार उशीर होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे. गाडी उशिरा धावत असल्याने नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे.
नाशिकरोड : नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला वारंवार उशीर होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे. गाडी उशिरा धावत असल्याने नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे.
पंचवटी एक्स्प्रेसवरील प्रवाशांचा भार हलका करण्यासाठी राज्यराणी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. मनमाड-मुंबई दररोज धावणारी राज्यराणी एक्स्प्रेस नाशिककर रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची गाडी होती. मात्र काही दिवसांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने ही गाडी नांदेड-मुंबई अशी सुरू केल्यामुळे नाशिककर प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नांदेड-मुंबई सुरू केलेली राज्यराणी एक्स्प्रेस ही आपल्या निर्धारित वेळेत धावत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सकाळी सव्वासहा वाजता येणारी ही गाडी बुधवारी तब्बल पावणेचार तास उशिराने सकाळी १० वाजता आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नाशिककरांसाठी मनमाडपासून असलेल्या राखीव बोगीत नांदेड, औरंगाबादचे प्रवासी बसून येत असल्याने त्यावरून रोज वाद होतात. परभणी-मुखेड दरम्यान रेल्वेचे काम सुरू असल्याने राज्यराणी एक्स्प्रेस गाडी पूर्वीप्रमाणे मनमाडहूनच सोडावी तसेच नाशिककरांसाठी असलेल्या बोगी नाशिकरोडलाच उघडाव्यात, महिलांसाठी स्वतंत्र बोगी द्यावी आदी मागण्या रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे, संजय शिंदे, प्रफुल्ल विसपुते, व्यंकटेश, किरण बोरसे, विजय तुंगार आदींनी केल्या आहेत.
मुंबईला जाण्यासाठी सुविधा
पंचवटी एक्स्प्रेस नाशिकहून सकाळी सव्वासातला, तर राज्यराणी एक्स्प्रेस सकाळी सव्वासहाला सुटते. पंचवटीत जागा मिळत नसल्याने व पंचवटी आधी ही गाडी असल्याने मुंबईला लवकर जाण्यासाठी राज्यराणी उपयोगी आहे. मात्र, गेल्या १० जानेवारीपासून रेल्वे प्रशासनाने राज्यराणी मुंबईहून नांदेडपर्यंत नेण्यास सुरुवात केल्याने नाशिककर रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे.