पुर्व भागात उन्हाळ कांद्याची जोमाने लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:13 AM2021-01-17T04:13:00+5:302021-01-17T04:13:00+5:30
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी कांद्याची लागवड जोमात सुरु आहे, मात्र ढगाळ हवामानामुळे कांदा लागवडीवर विपरीत परिणाम ...
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी कांद्याची लागवड जोमात सुरु आहे, मात्र ढगाळ हवामानामुळे कांदा लागवडीवर विपरीत परिणाम होत असल्याने लागवडीच्या खर्चात वाढ झाली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, बाभळेश्वर, मोहगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी, गंगापाडळी या परिसरात उन्हाळी कांदा लागवडीत शेतकरी व्यस्त आहेत. परतीच्या अति पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा महागडे बियाणे घेऊन रोपे तयार केली. त्यामुळे उशिराने का होईना पूर्व भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदे लागवड सुरु असल्याचे पाहायला मिळते. मुबलक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे विहिरींना भरपूर पाणी आहे. तसेच दारणा व गोदावरी नदीच्या पाण्याचाही पुरवठा होतो. त्यामुळे कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, पूर्व भागातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीमुळे कांदा लागवडीसाठी मजूर मिळेनासे झाले होते. त्यामुळे परगावातून मजूर आणून काम करावे लागले. एकरी आठ ते दहा हजार रुपये मजुरी देऊन ठेका पध्दतीने कांदा लागवड केली जाते. कांदा लागवडीपूर्वी शेतीच्या मशागतीसाठी एकरी पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो. बियाणे खरेदीपासून लागवडीयोग्य होईपर्यंतचा खर्च, शेणखत व मजुरांची वाहतूक व लागवड पाहता येणारा खर्च भरून निघेल, याची शाश्वती नसल्याची माहिती गंगाधर धात्रक यांनी दिली. दरम्यान, एकिकडे कांदा लागवड सुरु असली तरी आगाऊ लागवड केलेल्या कांद्याचे शेंडे ढगाळ हवामानामुळे पिवळे पडू लागले आहेत. त्यामुळे महागड्या औषधांची फवारणी करुन पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.
कोट===
कांदा लागवडीचा वाढता खर्च, रोपांचा अभाव, मजुरांची टंचाई, रासायनिक खते व औषधांचे वाढलेले भाव, विजेचे भारनियमन अशा अनेक अडचणींना सामोरे जात शेतकऱ्यांना कांदा लागवडीसाठी कसरत करावी लागत आहे.
- संपत धात्रक, शेतकरी
(फोटो १६ कांदा)