मक्याचे भाव घसरल्याने शेतकरीवर्गात निराशा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:33 PM2020-02-17T22:33:15+5:302020-02-18T00:25:43+5:30
येवला तालुक्यात यंदा खरीप हंगामातील मका पिकाच्या उत्पादनात घट झाली असून, भावदेखील कमी होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मानोरी : येवला तालुक्यात यंदा खरीप हंगामातील मका पिकाच्या उत्पादनात घट झाली असून, भावदेखील कमी होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मानोरी बुदू्रक, देशमाने, मुखेड, खडकीमाळ आदी परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या मका उभ्या शेतात सडून गेल्यानंतर काही ठिकाणी चांगली राहिलेली मका शेतात उभी होती. या मकाची सोंगणी झाल्यानंतर यंदा मकाची कमतरता जाणवणार आणि पुढील काही महिन्यात मक्याचे भाव दरवर्षीपेक्षा जास्त राहणार अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला लागून होती.
मात्र चार महिने उलटूनही आज ना उद्या मकाचे भाव चांगल्याप्रकारे वाढतील या आशेने मानोरी बुदू्रक परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या मकाच्या बिट्या खळ्यात पडून असून, बाजार समितीत भावदेखील सातत्याने घसरत चालल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मकाच्या बिट्याचा गंज एकाच ठिकाणी पडून असल्याने उंदरांनी मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, आशेपोटी ठेवलेली मका आता शेतकºयांना झालेला खर्च फिटनेदेखील आवाक्याबाहेर करणार असल्याची चिंता शेतकºयांना लागली आहे. गतवर्षी कोरडा दुष्काळ असल्याने कोणत्याच पिकातून साधा उत्पादन खर्चदेखील भरून न निघाल्याने यंदा खरीप आणि रब्बी हंगामातील पिकासाठी लागणारी बियाणे, खते कृषी दुकानदारांकडून उधारी करून घेतली असून, अनेक शेतकºयांनी लोकांकडून उसनवारी करून मशागतीचा खर्च करण्याचा प्रयत्न केला होता.
अनेक शेतकºयांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून हजारो रुपये खर्चून मका पीक वाचविण्यात यशस्वी ठरले होते, तर अनेक शेतकºयांनी लष्करी अळीग्रस्त मकावर नांगर फिरवला होता. सोमवारी (दि.१७) लासलगाव बाजार समितीत सकाळ सत्रात मक्याला अवघा कमाल १७०२, किमान १४५२, तर सरासरी १४९० इतका भाव मक्याला मिळाल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित कोलंडले आहे.
महाआघाडी सरकारने दोन लाख रु पयांपर्यंत असलेले शेतकºयांचे पीक कर्जमाफ करण्याची घोषणा केली असली तरी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या पीककर्जधारक शेतकºयांनादेखील कर्जमाफी योजनेत समाविष्ट करण्याची मागणी शेतकरी करत असून, कर्जमाफी करण्याची प्रक्रि या तत्काळ सुरू करून सर्व शेतकरी पीक कर्जधारकांना या कर्जमाफी योजनेचा लाभ होईल, अशी योजना शासनाने तयार करणे गरजेची असल्याची चर्चा शेतकरीवर्ग करत आहेत.
अवकाळी पावसाने आणि लष्करी अळीने मकाचे पीक हातून गेल्यानंतर झालेला खर्च व कृषी दुकानदारांकडून घेतलेली बियाणे, खतांचे पैसे कशाच्या आधारावर फेडावी ही मोठी द्विधा बळीराजाला लागलेली आहे. यामुळे सरसकट कर्जमाफीची मागणी होत आहे.
‘कोरोना’ भीतीने मका घेण्यास टाळाटाळ
चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना नावाच्या विषाणूच्या अफवेच्या धसक्यानेदेखील पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबडी खाद्य म्हणून मका घेण्यास टाळाटाळ करत असल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे दिसून आले आहे. यंदा जून महिन्यात समाधानकारक पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली होती. पिके दर्जेदार आलेली असताना अचानक मका पिकावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीने प्रादुर्भाव केल्याने निम्म्याहून अधिक शेतकºयांच्या मका खराब होऊन गेल्याचे दिसून आले.