विजतारेवर सळई मारण्याची मित्रांनी लावलेली पैंज जीवावर बेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 09:29 PM2020-01-13T21:29:43+5:302020-01-13T22:01:53+5:30
नेम धरुन लोखंडी सळई महावितरणच्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीला कोण मारणार अशी पैंज लागली. यावेळी दोघा संशयितांपैकी एकाने लोखंडी सळई विद्युततारेवर मारली.
नाशिक : महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीवर लोखंडी सळई मारण्याची मित्रांमध्ये लागलेली पैंज अल्पवयीन मुलाच्या मृत्यूस निमंत्रण देणारी ठरली. गंगापूररोडवरील संत कबीरनगर परिसरात वीजेचा शॉक लागून एका मुलगा मंगळवारी (दि.७) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास गंभीररित्या जखमी झाला होता. साहिल अशोक खरे (१७) या जखमी मुलाचा उपचारादरम्यान जिल्हा शासकिय रूग्णालयात रविवारी (दि.१२) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, संत कबीरनगरमध्ये समाजमंदिराशेजारी रहिवाशी मंगल कंकाळे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांच्या गच्चीवर कालिदास वाघमारे व अमोल उर्फ बाळू कंकाळ (दोघे रा. संत कबीरनगर) हे साहीलसोबत बसलेले होते. त्यावेळी या तिघांमध्ये नेम धरुन लोखंडी सळई महावितरणच्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीला कोण मारणार अशी पैंज लागली. यावेळी दोघा संशयितांपैकी एकाने लोखंडी सळई विद्युततारेवर मारली. यामुळे स्पार्किंग होऊन ठिणग्या गच्चीवर बसलेल्या साहिलच्या अंगावर पडल्याने त्याच्या कपड्यांनी पेट घेतला व तो गंभीररित्या भाजला. त्यास तत्काळ जिल्हा रूग्णालयात परिसरातील नागरिकांनी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या घटनेने संपुर्ण संत कबीरनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी त्याच्या मृत्यूस निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित कालिदास व अमोल यांच्याविरूध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.