मैत्रीचा ‘घात’ : ७०० रूपयांच्या उसनवारीसाठी मित्रानेच काढला मित्राचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 07:57 PM2020-07-28T19:57:21+5:302020-07-28T19:58:33+5:30
'' १८ हजार रुपये असतानाही ७०० रुपये का देत नाही'' यावरुन वाद
नाशिक : मोहदरी घाटात १९ जुलैला एका युवकाचा मृतदेह आढळला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. उसने दिलेले ७०० रुपये परत करण्यास नकार दिल्याने मित्रानेच मित्राचा खुन केल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी संदीप मनोहर सोनवणे (२६, रा. अशोकनगर, सातपूर) यास अटक केली आहे.
मोहदरी घाट परिसरातील वन उद्यानाजवळ १९ जुलैला एक मृतदेह आढळून आला होता. डोक्यास मार असल्याने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो मृतदेह अशोक बारकु महाजन (३८, रा. श्रमिकनगर, सातपूर) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरुवात केली. त्यानुसार अशोक महाजन हे औद्योगिक वसाहतीत प्रॉक्सी पेंटीगची कामे करत असल्याचे समजले. त्यांच्यासोबत संदीप सोनवणे हा देखील असल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशीत त्याने अशोक यांचा खून केल्याची कबुली दिली.अशोक आणि संदीप यांच्यात एक ते दीड वर्षांपासून मैत्री होती. काही दिवसांपूर्वीच अशोक यांनी संदीपकडून ७०० रुपये उसने घेतले होते. औद्योगिक वसाहतीतून एकाकडून १८ हजार रुपये घेऊन दोघेही दुचाकीवरुन नाशिकला येण्यासाठी निघाले. मोहदरी घाटात संदीपने अशोककडे उसने दिलेले ७०० रुपये मागितले. मात्र अशोक यांनी पैसे नंतर देतो, असे सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला.'' १८ हजार रुपये असतानाही ७०० रुपये का देत नाही'' यावरुन वाद सुरु असताना संदीपने एक दगड उचलून अशोकच्या डोक्यात टाकला. त्यातच अशोकचा मृत्यू झाला. त्यानंतर संदीपने अशोककडील १८ हजार रुपयांची रोकड घेऊन नाशिक गाठले. पोलिसांनी संदीप यास अटक केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहायक निरीक्षक अनिल वाघ, सहायक उपनिरीक्षक प्रभाकर पवार, हवालदार प्रकाश चव्हाणके, नाइक प्रितम लोखंडे, हेमंत गिलबिले, शिपाई निलेश कातकाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.