‘मॉब लिंचिंग’विरोधात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 01:14 AM2019-07-16T01:14:49+5:302019-07-16T01:15:19+5:30
नाशिक : ‘बहुजन मुस्लीम एकता जिंदाबाद’, ‘हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा हैं’, ‘आतंकवाद मुर्दाबाद’, ‘हर ...
नाशिक : ‘बहुजन मुस्लीम एकता जिंदाबाद’, ‘हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा हैं’, ‘आतंकवाद मुर्दाबाद’, ‘हर जात धर्म का सन्मान करो, वरना कुर्सी खाली करो’, ‘इंकलाब जिंदाबाद’ अशा घोषणा देत हातात काळे ध्वज घेत हजारो नाशिककर झुंडबळीच्या विरोधात रस्त्यावर उतरले. सुमारे अडीच तास चाललेल्या मोर्चाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
निमित्त होते, देशांतर्गत एका ठराविक समाजाच्या तरुणांना एकटे गाठून मारहाण करत ठार मारणाºया झुंडशाहीच्या (मॉब लिंचिंग) निषेधार्थ बहुजन मुस्लीम संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (दि.१५) काढण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मोर्चाचे. जुने नाशिक भागातून दुपारी सव्वाबारा वाजता मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. हा मोर्चा निश्चित केलेल्या मार्गावरून सुमारे अडीच तास सुरू होता. प्रारंभी चौकमंडईमधील जहॉँगीर मशिदीजवळ शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी राष्टÑीय एकात्मता जोपासली जावी, भारताची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि सर्व मानवजातीचे कल्याण व्हावे यासाठी दुवा मागितली.
मोर्चामध्ये जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, सिडको, सातपूरसह घोटी, इगतपुरी, हरसूल, निफाड, विंचूर, मालेगाव, चांदवड आदी तालुक्यांच्या ठिकाणावरूनही बहुजन, मुस्लीमबांधव सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येकी आठ मंडळांमध्ये नागरिकांनी संचलन केले. प्रत्येक मंडळासोबत ध्वनिक्षेपक यंत्रणा असलेली एक रिक्षा होती. मोर्चाच्या अग्रभागी खतीब यांच्यासह समितीचे पदाधिकारी, धर्मगुरू, राजकीय नेते होते. तसेच हातात राष्टÑध्वज तिरंगा घेतलेले दोन युवक सहभागी झाले होते. मोर्चामध्ये केवळ पुरुषांनाच सहभागाची परवानगी असल्यामुळे महिला सहभागी झाल्या नव्हत्या. झुंडीने एखाद्या युवकाला हल्ला करून ठार मारण्याची हिंसक वृत्ती देशाच्या एकात्मतेला घातक ठरणारी असून, या वृत्तीला सरकारने खतपाणी न घालता वेळीच पायबंद घालण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी यावेळी केली.
झारखंडच्या सरायीकेरा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मॉब लिंचिंगमध्ये तबरेज अन्सारी नावाच्या युवकाला ठार मारले गेले. त्यानंतर ‘मॉबलिंचिंग थांबवा, भारत वाचवा’चा आवाज देशभरातून बुलंद होऊ लागला. या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लीम, बहुजन रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. मोर्चात सुमारे दहा ते बारा हजार नागरिक सहभागी झाल्याचा अंदाज पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी वर्तविला. मोर्चासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अडीच तासांनंतर सर्व मोर्चेकरी ईदगाह मैदानावर पोहचले. विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर प्रार्थना करण्यात आली. राष्टÑगीताने मोर्चाची सांगता झाली.
असा होता मोर्चाचा मार्ग
४चौक मंडई (वाकडी बारव), फाळके रोड, दूधबाजार, शहीद अब्दुल हमीद चौक, खडकाळी सिग्नल, जीपीओ रोड, त्र्यंबकनाका सिग्नलमार्गे ईदगाह मैदान. या मार्गावरून मोर्चा अडीच तास चालला. दरम्यान, मुंबईनाक्याकडून अशोकस्तंभाकडे जाणारी वाहतूक महामार्ग, गडकरी चौक सिग्नलवरून चांडक सर्कलमार्गे वळविण्यात आली होती. मोर्चाच्या मार्गावर चार ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. तसेच स्वयंसेवकही मोर्चेकºयांना मार्गदर्शन करत होते.
दुपारनंतर जुन्या नाशकात व्यवहार सुरळीत
४मोर्चामुळे सकाळपासूनच फाळके रोड, चौकमंडई, दूधबाजार, भद्रकाली, खडकाळी या भागातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. दुपारी सव्वाबारा वाजेपासून अडीच वाजेपर्यंत मोर्चेकरी मार्गस्थ होत होते.
असा होता बंदोबस्त
४उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १ सहायक आयुक्त, ७ पोलीस निरीक्षक, २२ उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, १६२ पोलीस कर्मचारी, ४१ महिला पोलीस, राज्य राखीव दलाचे एक प्लॅटून, २ स्ट्रायकिंग फोर्स असा पोलीस बंदोबस्त होता.
जिल्हाधिकाºयांना निवेदन
शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, शहर-ए-काझी मोईजोद्दीन सय्यद, समितीचे उपाध्यक्ष आसिफ शेख, किरण मोहिते, वामनदादा गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेऊन राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या नावाने निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळाने मांढरे यांच्याशी चर्चा करत मोर्चाचा उद्देश पटवून दिला. निवेदनावर शिष्टमंडळामधील सर्व सदस्यांच्या स्वाक्षºया आहेत.
चार भाषांमधून विद्यार्थ्यांचे मनोगत
शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर मार्चेकरी दुपारी ३ वाजता पोहचले. येथे शाद शेख (उर्दू), श्रावस्ती मोहिते (मराठी), अर्शीया सिद्दीकी (इंग्रजी), इन्शीरा खान (हिंदी) या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. चार भाषांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
अशा आहेत प्रमुख मागण्या
अल्पसंख्याक समाजाच्या सर्व जाती-धर्माच्या लोकांना संरक्षण द्या.
‘मॉब लिंचिंग’चे खटले जलदगती न्यायालयात चालवून दोषींना शिक्षा द्यावी.
या घटना रोखण्यासाठी कायद्यात स्वतंत्र तरतूद करावी.
पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी.
मॉब लिंचिंगसारख्या घटनांचे समर्थन करणाऱ्या राजकीय, धार्मिक नेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी.