मारेकऱ्यांच्या अटकेसाठी आयुक्तालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:01 AM2018-06-19T01:01:40+5:302018-06-19T01:01:40+5:30
जागेच्या कारणावरून कुरापत काढून संत कबीरनगरमधील रहिवासी राजू शेषराव वाघमारे (वय ४५, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी, भोसला मिलिटरी स्कूलच्या मागे, गंगापूररोड) यांना अंबडच्या गरवारे येथील आठ-दहा संशयितांनी जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१५) रात्रीच्या सुमारास घडली होती़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वाघमारे यांचा (दि़१७) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयितांवर प्रथम जिवे ठार मारण्याचा व त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़
नाशिक : जागेच्या कारणावरून कुरापत काढून संत कबीरनगरमधील रहिवासी राजू शेषराव वाघमारे (वय ४५, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी, भोसला मिलिटरी स्कूलच्या मागे, गंगापूररोड) यांना अंबडच्या गरवारे येथील आठ-दहा संशयितांनी जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१५) रात्रीच्या सुमारास घडली होती़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वाघमारे यांचा (दि़१७) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयितांवर प्रथम जिवे ठार मारण्याचा व त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, गंगापूर पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याचा तसेच आरोपींना मोकाट सोडल्याचा आरोप करून नागरिकांनी पोलीस आयुक्तालयावर सोमवारी (दि़१८) सकाळी मोर्चा काढून पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली़ गंगापूर पोलीस ठाण्यात शकुंतला राजू वाघमारे (वय ३५, रा़ संत कबीरनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित संजय लक्ष्मण खरात, कल्पेश संजय खरात (दोघेही रा़ कबीरनगर), सुंदर लक्ष्मण खरात, प्रशांत सुंदर खरात (रा़ गौतमनगर, गरवारे कंपनीसमोर, अंबड) व त्याचे तीन-चार साथीदार हे लाठ्या-काठ्यांसह शुक्रवारी (दि़१५) रात्री ११ वाजेच्या सुमारास सिल्व्हर रंगाच्या इनोव्हा कारमधून आले़ यानंतर जागेच्या कारणावरून कुरापत काढून संशयित खरात व त्यांचे साथीदार बळजबरी घरात घुसले व शिवीगाळ व आरडाओरड करून दमदाटी करून पती राजू वाघमारे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ यानंतर या संशयितांनी राजू वाघमारे यांना उचलून जमिनीवर आपटले व लाथा-बुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राजू वाघमारे यांना कुटुंबीयांनी तत्काळ महात्मानगर येथील सिक्स सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते़ उपचार सुरू असताना रविवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास वाघमारे यांचा मृत्यू झाला़ गंगापूर पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला तसेच संशयित खरात विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता़ जखमी वाघमारेचा उपचारादरम्यन मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
संशयितांना पाठीशी घातल्याचा आरोप
वाघमारे यांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर त्यांचे कुटुंबीय गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी गेले असता पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून घेतला नाही तसेच संशयितांना अटक न करता पाठीशी घातल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे़ सोमवारी (दि़१८) सकाळी संत कबीरनगरमधील नागरिकांनी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला़ तसेच जोपर्यंत संशयितांना पोलीस अटक करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली़ सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोर हा मोर्चा अडविण्यात आला होता़ या मोर्चातील वाघमारे कुटुंबीयांनी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्याशी चर्चा केल्यानंतर व त्यांनी संशयितांना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर राजू वाघमारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संशयित खरात हे इनोव्हा कारमधून आले़ हातात लाठ्या-काठ्या घेतलेले बळजबरीने काकांच्या घरात घुसले व त्यांना बेदम मारहाण केली़ या घटनेनंतर आम्ही गंगापूर पोलीस ठाण्यात गेलो, मात्र पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही़ संशयित समोर असतानाही त्यांना अटक केली नाही़ त्यामुळे न्याय मिळावा यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी संशयितांना अटक करून कठोर कारवाईचे आश्वासन दिले़
- सुमीत वाघमारे, मयताचा पुतण्या