मातंग समाजाचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
By admin | Published: December 29, 2015 11:33 PM2015-12-29T23:33:19+5:302015-12-29T23:35:05+5:30
मातंग समाजाचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
नाशिकरोड : नागपूर येथे मातंग समाजाच्या आरक्षण मोर्चावर झालेला लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा मातंग समाजातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या.
नागपूर येथे मातंग समाजाच्या आरक्षण मोर्चावर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बाळासाहेब अस्वले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागपूर येथे राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मातंग समाजाचे स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीसाठी काढलेल्या मोर्चावर लाठीहल्ला करून ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वृद्ध महिला, पुरूष, लहान मुले जखमी झाले. मातंग समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज असताना सरकार मात्र चर्चा करून मुद्दा सोडविण्या- ऐवजी दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मोर्चावर लाठी हल्ला केला त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अण्णा भाऊ साठे महामंडळाचा कर्जपुरवठा सुरळीत करून मंडळावर अध्यक्ष नेमण्यात यावा, मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ, ब, क, ड नुसार आरक्षण मिळावे, लहुजी साळवे आयोगा अंतर्गत समाजातील बेरोजगार मुलांना शहरात मुख्य ठिकाणी व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर बाळासाहेब अस्वले, भारत जाधव, साहेबराव शृंगार, रावसाहेब अस्वले, सुधाकर गायकवाड, लहू घोडे, कृष्णाजी बलसाने, समाधान घोडेस्वार, किशोर साठे, पप्पू दिग्रसकर, शंकर पालके, रामचंद्र तांबे, चंद्रकांत आल्हाट आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)