एकलहरे शिवारात जमिनीच्या वादातून दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:33 AM2018-11-25T00:33:49+5:302018-11-25T00:34:05+5:30
एकलहरे शिवारात जमिनीच्या वादावरून दोन गटात शिवीगाळ होऊन धक्काबुक्की व दमदाटी केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिकरोड : एकलहरे शिवारात जमिनीच्या वादावरून दोन गटात शिवीगाळ होऊन धक्काबुक्की व दमदाटी केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जेलरोड येथील साहेबराव बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पंचक शिवारातील हॉटेलजवळ नितीन भागवत व इतर लोकांसह गप्पा मारत होतो. यावेळी शिवाजी सानप, जयंत सानप, हेमंत सानप, शिवाजी सानप यांचा पांढरा टी-शर्ट घातलेला मुलगा व ९ ते १० जण दोन गाड्यांमधून उतरून हातात दांडे घेऊन साहेबराव बोराडे यांच्याकडे हल्ला करण्याच्या उद्देशाने आले आणि शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की केली. तसेच हॉटेलमधील नुकसान केले.
तर दुसऱ्या फिर्यादीत पंचवटी हिरावाडी प्रिन्स टॉवर येथील जयंतीभाई कानजीभाई पटेल यांनी म्हटले आहे की, पटेल यांच्या एकलहरे शिवारातील खडीक्रशरवर नितीन भागवत, किरण मोरे, शंकर भिकाजी बोराडे, तात्या बोराडे, पिंटू लक्ष्मण बोराडे व इतर १५-२० जणांनी येऊन क्रशरवरील महिला कामगार वनिता दामोदर लोखंडे यांना खदनीचे काम बंद करा, मशीनरी काढुन घ्या असे म्हणून रस्ता बंद केला. यामुळे आमचे नुकसान झाले आहे. तसेच बुधवारी सकाळी पटेल यांच्या शेतीमध्ये काम करणारे सतीश पावसे यांना बोराडे कुटुंबातील १५-२० जणांनी दमदाटी केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.