फळभाज्यांचे बाजारभाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:55 PM2019-07-27T23:55:05+5:302019-07-27T23:55:48+5:30
गेल्या आठवड्यात काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. आता पावसाने मागील दोन दिवसांपासून हजेरी लावल्याने बळीराजा काहीसा सुखावला आहे. विशेषत: मुंबई शहरात पावसाने चांगलाच जोर धरल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मुंबईला जाणाऱ्या फळभाज्या मालाची निर्यात काही प्रमाणात कमी झाली आहे.
पंचवटी : गेल्या आठवड्यात काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. आता पावसाने मागील दोन दिवसांपासून हजेरी लावल्याने बळीराजा काहीसा सुखावला आहे. विशेषत: मुंबई शहरात पावसाने चांगलाच जोर धरल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मुंबईला जाणाऱ्या फळभाज्या मालाची निर्यात काही प्रमाणात कमी झाली आहे. याशिवाय शेतमालाला उठाव नसल्याच्या कारणाने बाजारभाव घसरले आहेत. फळभाज्यांचे बाजारभाव घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भोपळा, कारले, दोडके, गिलका, काकडी, भेंडी, गवार, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, वांगी यांसारख्या फळभाज्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतमालाला उठाव कमी झाला आहे. परिणामी बाजारभावात चांगली घसरण झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भेंडी १०, गवार २०, हिरवी मिरची ३५, कारले १०, गिलका १२, तर ढोबळी मिरची १५ रुपये प्रतिकिलो दराने विक्र ी झाली.
पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई तसेच उपनगरात शेतमाल पाठविला असला तरी उठाव नसल्याने दर घसरले आहेत, तर मध्यंतरी चार ते पाच दिवस पावसाने उघडीप दिल्याने मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची आवक वाढली. त्यामुळे शेतमालाला उठाव आहे.
मुंबई शहरात सुरू असलेला पाऊस फळभाज्यांची वाढलेली आवक आणि मालाला उठाव नसल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर काही प्रमाणात झाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले आहे.