टॅँकरपासून मुक्ती मनेगाव येथील ज्येष्ठांच्या मेहनतीला आले फळ
By admin | Published: September 30, 2016 11:43 PM2016-09-30T23:43:25+5:302016-09-30T23:44:03+5:30
जुनं ते सोनं : लोकवर्गणीतून रुंदीकरण केलेले नाले झाले प्रवाहित
शैलेश कर्पे ल सिन्नर
तालुक्यातील मनेगाव येथील जय हरी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून नाल्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आले होते. सुमारे आठ किलोमीटरच्या नाल्यांचे पुनर्ज्जीवन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मोठी मेहनत घेतली होती. यावर्षीच्या पावसाळ्यात निसर्गाच्या कृपेमुळे व ज्येष्ठ नागरिकांच्या मेहनतीमुळे तुडुंब भरून वाहू लागल्याने दुष्काळाच्या शापातून या परिसराची सुटका झाली आहे. सिन्नर तालुक्यातील मनेगाव परिसर तसा दुष्काळीच. गेल्या काही वर्षापासून या भागात पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचा टॅँकर सुरू होता. एप्रिल महिन्यात पाण्याची समस्या आणखीणच तीव्र झाली होती. या पार्श्वभूमीवर गावातील टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी जय हरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एम.आर. शिंदे, अॅड. सी.डी. भोजणे, सोपानराव शिंदे, रावसाहेब सोनवणे, विठ्ठल आंबेकर, भाऊसाहेब सोनवणे, परशराम सोनवणे, टी.पी. सोनवणे, पंडितराव सोनवणे, तुकाराम पाटील, पी.पी. सोनवणे, अशोक बुजुडे, त्र्यंबक मुरकुटे यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी बैठक घेतली. आपण सोसलेले दुष्काळाचे चटके आपल्या पुढच्या पिढीला सोसावे लागू नये यासाठी या ज्येष्ठांच्या पुढाकाराने गावशिवारात असणाऱ्या चार नाल्यांचे पुनर्ज्जीवन करण्याची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दीड-दोन महिन्याच्या कालावधीत लोकसहभागातून सुमारे ८ किलोमीटर लांबीच्या चार नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याठी ज्येष्ठ नागरिक कामाला लागले आहेत. आमदार राजाभाऊ वाजे यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या कामासाठी एक पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले. मनेगाव शिवारात नाल्यांचे पुनर्ज्जीवन करण्याचे काम सुरू झाले आहे. घुळघुळा ओहळ, खोल्या ओहळ, हनुमानवाडी बंधाऱ्याचा ओहळ व बारभाई बंधाऱ्याच्या ओहळ असे चार नाले मनेगाव शिवारातून जातात. या चार नाल्यांची लांबी सुमारे ८ किलोमीटर आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या निरीक्षणाखाली सुमारे ४५ दिवस काम चालले. ४५ दिवसांत सुमारे ८ किलोमीटरच्या नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सर्व नाल्यांना चांगले पाणी आले. मनेगावच्या शिवारात पाणी झुळुझुळु वाहू लागले. ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या मेहतीला फळ आल्याची भावना सर्वजण व्यक्त करू लागले. यावर्षी निसर्गाची चांगली साथ लाभल्याने संपूर्ण नाले तुुडुंब भरले असून, मृत झरे जिवंत झाले आहे. या शिवारातील भूजल पातळीही बऱ्यापैकी वर आली आहे. या नाल्यांमध्ये चांगले पाणी साठल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी काठोकाठ भरल्या आहेत. या नाल्यांच्या कामाचा शिवारातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या कामासाठी महत्त्वपूर्ण मदत करणारे आमदार वाजे यांना बोलावून त्यांच्या हस्ते जलपूजन केले. सध्या सुमारे ८ किलोमीटरचे नाले पाण्याने तुडुंब भरल्याने यावर्षी मनेगावला उन्हाळ्यात टॅँकरची गरज भासणार नाही.
ज्येष्ठ नागरिकांच्या आवाहनास शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने दोन लाख रुपयांची लोकवर्गणी जमा होऊ शकली. यावर्षी संपूर्ण नाले जलमय झाल्याने सुमारे दोन वर्षे टॅँकरची गरज भासणार नाही. दरवर्षी शासनाचा टॅँकरसाठी या परिसरावर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे.- एम. आर. शिंदे, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संस्था
ज्येष्ठ नागरिकांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजाभाऊ वाजे, युवा मित्र संस्थेचे अध्यक्ष सुनील पोटे यांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन घेत लोकवर्गणीतून या कामास प्रारंभ केला. गेल्या पाच वर्षापासून तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या अनेक वर्षापासून अवर्षणाशी लढणाऱ्या मनेगावकरांना पाण्याची खरी किंमत कळाली होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लोकवर्गणी जमा करण्याच्या केलेल्या आवाहनास परिसरातील शेतकऱ्यांनीही प्रतिसाद देत सुमारे दोन लाख रुपयांची लोकवर्गणी जमा केली. तरुणाईलाही लाजवेल असे काम ज्येष्ठ नागरिक संघाने सुरू करून त्यात संपूर्ण गावाला सहभागी करून घेण्यात आले.