मालेगावचा फरार आरोपी अडीच वर्षांनी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 08:22 PM2021-01-01T20:22:01+5:302021-01-02T00:19:43+5:30
मालेगाव : शासनाचा कोणत्याही प्रकारचा गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या गौण खनिज वाहतुकीच्या खोट्या व बनावट पावत्या करून शासनाची फसवणूक करून बेकायदेशीररित्या चोरटी वाहतूक करून पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी गेल्या अडीच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी विलास निंबाजी शिंदे (५५) रा. आरती सोसायटी, प्लॉट नं. १००, देवपूर, धुळे यास द्याने - रमजानपुरा पोलिसांनी काल धुळे येथे छापा टाकून अटक केली.
४ मे २०१८ रोजी रमजानपुरा पोलिसात विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील आरोपी विलास शिंदे हा डंपर क्रमांक एमएच ०४ एचडी ७०८६ मधून वाळू वाहतूक करताना मिळून आला होता. त्यावेळी ट्रक खाली करून पुरावा नष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला. तसेच पोलिसांना धक्का मारून फरार झाला होता. गेल्या अडीच वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. त्याने सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना व्हॉट्स ॲपवरून धमकी दिल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी रचला सापळा
पोलीस उपनिरीक्षक सुभाष आगे, पोलीस कर्मचारी प्रशांत सोमवंशी, सुनील भामरे यांना शिंदखेडा येथील न्यायालयात आरोपी विलास शिंदे आल्याची माहिती मिळाल्याने दुपारी १२ वाजता त्यांनी तेथे सापळा लावला. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आरोपी शिंदे हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर आडवा पडून प्रकृती बरी नसल्याचे त्याने भासवले. पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय तपासणी केली असता तो आजारी असल्याचा बनाव करीत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यावरून त्यास अटक करून रमजानपुरा पोलिसात आणण्यात आले.