फरार सागर देशमुखला शिर्डीतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:16 AM2021-05-07T04:16:33+5:302021-05-07T04:16:33+5:30
नाशिक : शहरातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील राजीवनगर परिसरात सभागृह नेता सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केल्याप्रकरणी ...
नाशिक : शहरातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील राजीवनगर परिसरात सभागृह नेता सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केल्याप्रकरणी टोळीचा म्होरक्या संशयित सागर देशमुख यास गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने बेड्या ठोकल्या. तसेच त्याचा दुसरा साथीदार ईश्वर जगदाळे हादेखील पोलिसांच्या हाती लागला आहे.
राजीवनगर येथील संपर्क कार्यालयवर बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास आठ ते दहा मोटारसायकलवरून आरोपी सागर देशमुख व त्याचे १० ते १५ साथीदारांनी येत दगडफेक करून सोनवणे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. तसेच कार्यालयाबाहेर उभी असलेली महापालिकेची, शासकीय वाहनांचीही तोडफोड करण्यात आली होती. तोडफोड करून जाताना टोळक्यांनी ‘तुम्हाला सगळ्यांना बघून घेऊ’ असा दमही दिला होता. इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर देशमुखसह त्याच्या साथीदारांवर दरोडा, शासकीय वाहनांचे नुकसान, दंगलसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. इंदिरानगर पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट 1 चे पथकही याप्रकरणी समांतर तपास करत आहेत. दरम्यान, पथकातील पोलीस नाईक प्रवीण वाघमारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फरार सागर देशमुख व त्याचा साथीदार ईश्वर जगदाळे यास शिताफीने शिर्डीतून गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण पाच संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.