फरार मुद्रांक विक्रेत्याचा परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 06:52 PM2021-02-24T18:52:56+5:302021-02-24T18:53:43+5:30
देवळा : तालुक्यातील बनावट मुद्रांक प्रकरणातील फरार संशयित चंद्रकांत उर्फ गोटू वाघ या मुद्रांक विक्रेत्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई नोंदणी व मुद्रांक विभागाने केली असून, त्याच्याकडील मुद्रांक साठा, नोंदवह्या व मूळ परवाना जप्त करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी दिले आहेत.
देवळा : तालुक्यातील बनावट मुद्रांक प्रकरणातील फरार संशयित चंद्रकांत उर्फ गोटू वाघ या मुद्रांक विक्रेत्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई नोंदणी व मुद्रांक विभागाने केली असून, त्याच्याकडील मुद्रांक साठा, नोंदवह्या व मूळ परवाना जप्त करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी दिले आहेत.
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील परिपत्रकानुसार व मुंबई मुद्रांक विक्री व पुरवठा अधिनियम १९३४ चे कलम ७,१०,१२ व १३(२) अन्वये ही कार्यवाही करण्यात आली आहे. दुय्यम निबंधक श्रेणी-१,कार्यालय देवळा येथे एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक वापरून बनावट खरेदीखत तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नाशिक यांना प्राप्त झाल्यानंतर सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक कार्यालयास दि. ९ फेब्रुवारी रोजी त्यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने देवळा येथे दुय्यम निबंधक कार्यालयात त्रिसदस्यीय पथक चौकशीसाठी पाठवले होते. कार्यालयीन अभिलेखात बनावट दस्तऐवज समाविष्ट करून त्याची प्रमाणित प्रत दुय्यम निबंधक श्रेणी-१,देवळा या कार्यालयामार्फत देण्यात आल्याचे पथकाने सादर केलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले. सदरची बाब गंभीर स्वरूपाची असल्याने प्रभारी दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांचा कार्यभार तत्काळ काढून घेण्यात आला व या प्रकरणाशी संबंधित सर्व व्यक्तींवर भारतीय नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दुय्यम निबंधक श्रेणी- १, देवळा यांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने दि.१३ फेब्रुवारी रोजी मुद्रांक विक्रेता चंद्रकांत देवाजी वाघ व इतर यांच्यावर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून चंद्रकांत वाघ हा फरार असून देवळा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दस्तावेजबाबत असुरक्षितता
कार्यालयीन अभिलेखात बनावट दस्तावेज समाविष्ट करून त्याची प्रमाणित प्रत दुय्यम निबंधक श्रेणी-१ देवळा या कार्यालयामार्फत देण्यात आल्याचे चौकशी पथकाने सादर केलेल्या अहवालावरून आता स्पष्ट झाले आहे. आपले महत्त्वाचे दस्तऐवज कार्यालयात सुरक्षित नसल्याची बाब समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
सीसीटीव्हीची मागणी
देवळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अद्याप सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, नुकत्याच झालेल्या मुद्रांक घोटाळा प्रकरण तपासकामी सीसीटीव्ही फुटेज साहाय्यभूत ठरून दोषी व्यक्तींचा शोध घेणे सोपे झाले असते. संबंधित विभागाने या कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
फोटो - २४ देवळा मुद्रांक
दुय्यम निबंधक कार्यालय देवळा