खुनासह मोक्काच्या गुन्ह्यातील फरार संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:55+5:302021-04-10T04:14:55+5:30
नाशिक : श्रीरामपूर येथील एका खुनाच्या गुन्ह्यासह वेगवेगळ्या प्रकारच्या संघटित गुन्ह्यांच्या प्रकरणात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या व सोनसाखळीच्या गुन्ह्यात ...
नाशिक : श्रीरामपूर येथील एका खुनाच्या गुन्ह्यासह वेगवेगळ्या प्रकारच्या संघटित गुन्ह्यांच्या प्रकरणात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या व सोनसाखळीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित नईम मेहबुब सैय्यद याला पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. चेहडी पपींग स्टेशन परिसरातून २६ मार्चला महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरांनी खेचून नेले होते. त्यावेळी नागरिकांनी कपिल कृष्णा जेधे व गणेश रामदास बन या दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, त्यांचे दोन साथीदार मंगळसूत्रासह पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या घटनेतील संशयित नईम मेहबुब सैय्यद व त्याचा साथीदार ट्रीपल एक्स ऊर्फ रॉकी हे पुणे येथे असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांनी मिळाली. त्याआधारे रविवारी (दि.४ ) गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यात दाखल होत संशयितांचा शोध घेतला. मात्र, संशयित श्रीरामपूरकडे गेल्याची माहीती त्यांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचे पथक श्रीरामपूरच्या दिशेने रवाना झाले. सलग दोन दिवस शोध घेवून तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी एका आरोपीस लोणी येथील सैनी शाळेच्या परिसरातून नईम मेहबुब सैय्यद (वय ३०, रा.जुन्या तहसील कचेरी मागे, श्रीरामपूर,) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने साथीदारासह म्हसरूळ भागात ३, नाशिकरोड भागात २, पंचवटीत-१, भद्राकालीत१, अंबड १, उपनगर १,देवळाकॅम्प-१ व लोणी पोलीस ठाण्यात १ असे एकूण ११ गुन्हे सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच चोरी करण्यासाठी वापरलेली मोटारसायकलही लोणी येथून चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून ७ लाख ८ हजार चारशे रुपयांच्या १५४ ग्रॅम सोन्यासह ४० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ७ लाख ४८ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.